शेतकऱ्यालाही वर्क फ्रॉम होम करता यावे यासाठी संशोधन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे. शेतकऱ्यांना घरी बसून शेतीतील काही कामे करता येतील का, काही बाबी त्याला ‘वर्क फ्रॉम होम’ करता येतील का, याचा विचार संशोधकांनी करावा. शेतीला पाणी देणे, सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करतांना शेतकऱ्यांना घरी बसून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था विकसित करता येईल का, असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी ‘संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती 2020’ची 48 वी सभा अकोला येथे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रे बंद करावी लागली पण शेती हे एकच क्षेत्र असे होते जे पूर्णतः खुले राहिले. शेतकऱ्यांच्या जीवनातील अस्थिरता संपविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान याचा अधिकाधिक उपयोग करून बीज उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंतचा सुस्पष्ट, कालबद्ध आणि सकारात्मक परिणामांच्या दिशेने वाटचाल करणारा निश्चित संशोधन आराखडा राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी एकत्रितपणे तयार करून सरकारला सादर करावा, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

कृषी कायद्याबाबत केंद्राने मते जाणून घ्यावीत
केंद्रीय कृषि कायद्यातील सुधारणा या शेतकरी हिताच्या असाव्यात ही आपली आग्रही भूमिका असून यासाठी केंद्र शासनाने राज्यांच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठका घेऊन त्यांची मते जाणून घ्यावीत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यामध्ये शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ञ, संशोधक, बाजारपेठ क्षेत्रातील तज्ञ यांचीही मते घ्यावीत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या