
पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना संकटात राज्यातील जनतेने शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त पाळत सावधगिरी राखत होळी, गणेशोत्सव, नवरात्र हे सण साधेपणाने साजरे करण्यात आले. यंदा पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही. तसेच इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात नियम पाळले. त्यामुळे राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रींची इच्छा
या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, नियम शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.
हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो. पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आवाहनात म्हटले आहे.

























































