मुंबईला अखंडित वीजपुरठ्यासाठी विक्रोळीतील 400 केव्ही उपकेंद्र वेळत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत नुकत्याच झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत. विक्रोळी येथील 400 के.व्ही. जीआयएस उपकेंद्र प्रकल्पाचा आढवा घेऊन याचे काम तातडीने सुरू करून 2023पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

वर्षा निवासस्थानी विक्रोळी प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईला अखंडित वीजपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असा 2009 मध्ये मान्यता मिळालेला हा प्रकल्प इतकी वर्षे रखडणे योग्य नाही. हा प्रकल्प तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करा. टाटा पॉवर कंपनीने पुढील आठवडय़ापर्यंत विक्रोळी प्रकल्प उभारणीसाठी जागा अदानी ट्रान्समिशन लि.ला हस्तांतरित करण्याचे मान्य केले. जागेच्या ताब्यानंतर प्रकल्पाचे काम कोणत्याही स्थितीत 2023 पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईसाठी 1000 मेगावॅटची अतिरिक्त व्यवस्था
मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल, असा हा विक्रोळी प्रकल्प आहे. प्रकल्पांतर्गत मुंबईसाठी 1000 मे.वॅ. वीजपुरवठय़ासाठी अतिरिक्त व्यवस्था 2023 पर्यंत निर्माण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी खारघर उपकेंद्र येथून 400 केव्ही वीजवाहिनी उभारणे प्रस्तावित आहे. तसेच तळेगाव-कळवा 400 केव्ही विजवाहिनीवरून विक्रोळीपर्यंत 400 केव्ही वीजवाहिनी तसेच पडघा, नवी मुंबई या ग्रीड उपकेंद्राशी जोडणी करणे आदी बाबी समाविष्ट आहेत, अशी माहिती यावेळी प्रधान प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या