
‘देवेंद्र जी तुम्हाला केंद्राने रॉ-वर वैगरे घेतलं पाहिजे, म्हणजे काम अधिक वेगाने होईल.’ असा सणसणीत टोला लगावतानाच ‘आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण सगळी यंत्रणा अशा राबवणार की ती ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही’, अशी तोफ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षातील भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर डागली. केंद्रीय यंत्रणांकडून महाराष्ट्रात होणाऱ्या कारवाया आणि त्यावरून राज्यातील सत्ताधारी पक्षांचे नेते, कुटुंबीय यांचा सुरू असलेला छळ आणि बदनामी यावर त्यांनी कडक शब्दात हल्ला चढवला. विरोधकांकडून झालेल्या आरोपांची एक एक करून त्यांनी उत्तरे देत आरोप करणाऱ्यांची हवाच काढून घेतल्याचं यावेळी पाहायला मिळालं. ‘आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांची कधी बदनामी केली आहे का? त्यांच्या भानगडी काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. मी तुमच्यासोबत येतो सत्तेसाठी नाही, मला तुरुंगात टाका. पण असा कुटुंबीयांच्या मागे लागण्याचा निचपणा करू नका.’ इंदिरा गांधींनी घोषित आणिबाणी आणली होती, चांगली की वाईट ते सोडा, पण आज देशात अघोषित आणिबाणी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधी पक्षाने घातलेल्या गोंधळाचा उल्लेख करून ‘ज्यांनी राज्यपालांचं भाषण ऐकलं नाही, ते समाजसुधारकांचं काय ऐकणार?’ असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं.
केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांचा मुद्दा समोर आणताना त्यांनी विरोधकांचे कडक शब्दात कान टोचले. ते म्हणाले ‘प्रतीमा आणि बदनामी हा प्रकार सध्या बघायला मिळतो आहे. टीकेला मी घाबरत नाही, बदनामीलाही घाबरत नाही. कारण मी हा आहे तसा आहे. मी कसा आहे ते लोकांना माहित आहे आणि तसा राहणार. पण बदनामी करताना कोणत्या थराला जाऊन करायची? नवाब मलिक यांचा राजीनामा… जर दोषी असतील, संबंध असतील तर बघुना काय करायचं… पण तुम्ही आरोप करायचे, तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढा वेळा ते बोलायचं की सत्य वाटायला लागेल. एका गोष्टीचं दु:ख, आश्चर्य वाटतं की केंद्रीय यंत्रणा एवढ्या पोकळ झाल्या का? की तुमच्या मताप्रमाणे नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक आहेत ते मुंबईत आणि संपूर्ण देशात फिरताहेत, ते चार-चार पाच-पाच वेळा निवडून येत आहे. ते मंत्री बनताहेत तरी केंद्रातल्या यंत्रणेला ते दिसले नाही. केंद्राच्या यंत्रणेला माहितीच नाही. केंद्राच्या यंत्रणा मग करतात काय? नुसतं थाळ्या वाजवा, दिवे पेटवा – दिवे घालवा हे करायचं? मग जे दिवे लागताहेत त्याच्या प्रकाशात तरी बघा ना की दाऊदचा माणूस कोण कोण आहे. पण एक मी समजू शकतो की तीरंदाज जो आहे तो लक्ष्यभेद करतो, त्याच्यात कौशल्य पाहिजे. पण आता काय होतं आहे की ते बाण म्हणजे त्या तपास एजन्सी आहेत. ते हातात पकडून लक्ष्यावर खूपसले जात आहे. की हे तुझं लक्ष्य, हे तुझं शस्त्र. देवेंद्र जी तुम्हाला केंद्राने रॉ-वर वैगरे घेतलं पाहिजे, म्हणजे काम अधिक वेगाने होईल. कारण ती माहिती ED कडे तुम्ही दिली, असं तुमचं वक्तव्य मी वाचलं. म्हणजे ED मध्ये इतकी बेकार लोकं आहेत का? की त्यांना काहीच माहित नाही. द्या माहिती द्या. याला ठोकायचे आहे ठोकतो, त्याला ठोकायचे आहे त्याला ठोकतो. माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच, मग त्याप्रमाणे शिक्षाही हेच करतात. कारण अशा कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे पण सगळी यंत्रणा अशा राबवणार की ती ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही.’
ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली नव्हती…!
आपल्या भाषणात बोलताना त्यांनी चर्चेत असलेल्या ‘दाऊद’च्या विषयावरून विरोधकांचे कान पकडले. ‘हा दाऊद आहे तरी कुठे? कुणाला माहित आहे? दाऊद पाकिस्तानात आहे तर मग ज्या प्रमाणे अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार केलं. तसं ऑपरेशन तुम्ही केलं पाहिजे. दाऊदला फरफटत आणू असं सांगितलं जात होतं आता मात्र आपणच दाऊदच्या मागे फरफटत चाललो आहोत’, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले. किती वर्ष दाऊदचा विषय चघळणार? असा प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले की, अनेक वर्षे राम मंदिराच्या मुद्द्यावर आतापर्यंत मतं मागितली, आता किती वर्ष दाऊदच्या नावाने मतं मागणार का? म्हणजे आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? त्याने जी टॉवर्स पाडली तो देशावरचा हल्ला मानून त्याला ठार केले. ओबामाने कुणाची पर्वा केली नाही. ढग आहेत का त्याच्या मागून हेलिकॉप्टर पाठवू वैगरे सारखा थिल्लरपणा नाही केला. थेट सैन्य पाठवून त्याला ठार मारला. तसं दाऊदला घुसून मारा. जसं ओबामाने ओसामाला मारलं त्याला म्हणतात मर्द पणा!’
हे सर्व बोलतानाच आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधात आम्ही आहोतच हे त्यांनी पुन्हा एकदा सभागृहात स्पष्ट केलं. अफजल गुरू-बुऱ्हाण वाणी यांची बाजू घेणाऱ्या मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही सत्तेचा पाट मांडला होता की मग ते काय अफजल सरकार, बुऱ्हान सरकार होतं का? असा खणखणीत सवाल त्यांनी केली.
Live – द्वेषाच्या काविळीवर उपचार नाही! विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला




























































