पक्षीय राजकारण नको, म्हणत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला; पंतप्रधानांनीच मदतीचं आश्वासन दिल्याची दिली माहिती

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज सोमवारी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षीय राजकारण नको, असे म्हणत त्यांनी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला. तसेच स्वतः पंतप्रधान मोदी यांनी फोन करून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती दिली.

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –

– असं नाही की आजच मला ही परिस्थिती कळलेली आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहे. नुकसान किती होत आहे, पाऊस किती पडतोय याचा अंदाज आणि माहिती आम्ही सगळेच जण घेत आहोत.

– आम्ही उद्या व परवा पण इथे येणार आहोत. शेतकरी व सर्व आपत्तीग्रस्त, ज्यांचे घरदार, संसार वाहून गेले आहेत, ते वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आहेत. त्यांना आम्ही सांगितले आहे की, आपण काळजी व चिंता करू नका, जे जे करता येणे शक्य आणि आवश्यक आहे, ते सगळे आपले सरकार केल्याशिवाय राहणार नाही.

– येते काही दिवस अतिवृष्टीचा, धोक्याचा इशारा दिला गेला आहे. संकट पूर्ण टळले आहे, असे नाही. पंचनामे सुरू आहेत. पूर्ण परिस्थितीचा आढावा लवकरच घेतला जाईल आणि तो घेतल्यानंतर प्रत्यक्ष जी काही मदत करायची आहे, ते हे सरकार करणार आहे.

– दुर्दैवाने आपले काही बांधव, माता-भगिनी मृत्युमुखी पडल्या, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याची आवश्यकता असते, तो द्यायला आम्ही सुरुवात केली आहे. कोणीही काळजी करण्याचे व घाबरण्याचे कारण नाही फक्त अजून काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे, सावध रहा, प्राणहानी होता कामा नये.

– पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करणं ही केंद्राची जबाबदारी आहे. केंद्राकडून मदत मागण्यात चूक काहीच नाही. उलट शुक्रवारी पंतप्रधान मोदीजी यांचा मला फोन आला होता. गरज पडल्यास लागेल ती मदत करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

– अशावेळी पक्षीय राजकारण न करता सर्वांनी एक होऊन केंद्राकडे मदत मागावी. इथे राजकारण करू नये, मला ते करायचं नाही. शेतकऱ्यांना सहाय्य करणे, हा माझा प्राधान्यक्रम आहे.

– पाऊस विचित्र पडतोय. एका 72 वर्षांच्या शेतकरी दादांनी सांगितले की, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी असा पाऊस पाहिलेला नाही.

– उजनी धरणातील विसर्गाबाबत पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल.

– जनतेला मी आवाहन करतो की गाफील राहू नका, पावसाचा इशारा आहे. काळजी घ्या, सुरक्षित ठिकाणी रहा. सरकार तुमच्यासोबत आहेच पण, स्वत:ला जपा.

आपली प्रतिक्रिया द्या