
राज्य सरकार तसेच महापालिकेकडे निधी प्रलंबित असल्याने रुग्णसेवा बंद करण्यात आल्याचा दावा करीत वाडिया रुग्णालयाकडून रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका, राज्य शासन तसेच वाडिया प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सरकारकडून 24 कोटी रुपये तत्काळ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याचप्रमाणे महापालिकेकडून 22 कोटींचा निधी असे दोन्ही मिळून 46 कोटींच्या आर्थिक मदतीचा बुस्टर डोस वाडिया रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाडिया रुग्णालयाने तत्काळ रुग्णसेवा सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे लाखो मुंबईकरांचे ‘जन्मस्थान’ असलेल्या वाडिया रुग्णालयाला जीवदान मिळाले आहे.
वाडिया रुग्णालयासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. राज्य सरकार, महापालिका तसेच वाडिया प्रशासनाच्या घेण्यात आलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी वाडिया प्रशासनाचीही बाजू ऐकून घेतली. या बैठकीविषयीची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापालिका तसेच राज्य शासनाकडून 46 कोटी देण्याबाबत निर्णय झाला आहे. रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱयाच्या नोकरीवर परिणाम होणार नाही. त्यामुळे तत्काळ रुग्णसेवा सुरू करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या वतीने नस्ली वाडिया यांनीही रुग्णसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याचे महापौर म्हणाल्या.
वाडिया रुग्णालयाचा निधी तसेच अन्य प्रश्नांबाबत राज्य सरकार, महापालिका आणि वाडिया प्रशासन यांची संयुक्त समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱयांचा प्रश्न, कर्मचाऱयांना देण्यात आलेले वेतन तसेच रुग्णालयात वाढविण्यात आलेल्या खाटा या विषयांबाबत येत्या 10 दिवसांत अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात येणार असून मुख्यमंत्री यावर निर्णय घेणार आहेत.
































































