लोकांमध्ये जिद्द निर्माण करा म्हणजे लढाई लढणे सोपे जाईल! मुख्यमंत्र्यांचे आवाहन

722

मुंबईत 2010 मध्ये मलेरिया, डेंग्यूच्या वेळी मुंबईच्या वस्त्यावस्त्यांत लोकांच्या मदतीने फवारणी केली होती. त्याचप्रमाणे मिशन मोडवर हे काम सर्वांनी करावे. लोकांमध्ये जिद्द निर्माण करा म्हणजे ही लढाई लढणे सोपे जाईल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी आज ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला व महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सर्व आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले.

मार्चपासून जुलैपर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला. आज मुंबईमध्ये ज्या रीतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा त्या महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढय़ा सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येणाऱया काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरू करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांचीदेखील मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलेसिस सुविधा आहेत असेही ते म्हणाले.

पालिका आयुक्त बदलण्यामागे अकार्यक्षमता नव्हे!
या तीन-चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करू नये याविषयी सर्वांना पुरेशी माहिती झाली आहे. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली तर आपल्याला अपेक्षीत यश मिळेल अशी मला खात्री आहे. यापूर्वीचे पालिकांतील काही अधिकारी बदलले कारण ते कार्यक्षम नव्हते असे नाही पण आता कोरोनाची वाढ गुणाकारासारखी होते आणि आहे. त्यामुळे आपल्याला खूप तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. आपण पुढे काही करण्याचा आता दररोज रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढताना दिसत असल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा, शिवसेनेच्या मंत्र्यांची वर्षावर बैठक

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची व्हिडीओ काँन्फरन्सच्या माध्यमातून तातडीची बैठक बोलावली होती.

या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शिवसेनेचे अन्य काही मंत्री वर्षावर उपस्थित होते. तर अन्य मंत्री व्हिडीओ काँन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते. यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता या बैठकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या वेगवेगळ्या जिह्यातील कोरोनाच्या उपाययोजना व भविष्यात आणखी काय उपाययोजना करण्यात येतील याचा आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या