
राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकीकडे भक्कमपणे उभे असताना दुसरीकडे मात्र सत्तास्वप्न पाहणारे भाजप नेते दररोज नवी भविष्यवाणी करून राजकीय चर्चा घडवत असतात. आज मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच एक गुगली टाकली आणि मग दिवसभर राजकीय भुवया उंचावल्या गेल्या, चर्चा रंगल्या!
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने संभाजीनगर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करतानाच ‘व्यासपीठावरील सर्व आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी’ असा उल्लेख केला आणि दानवे-कराड यांच्याकडे वळून बघितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चा रंगू लागली, अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले, समीकरणे मांडली गेली. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया देऊ लागले.
मुख्यमंत्री काय म्हणाले
आजी-माजी आणि भावी सहकारी या विधानाबद्दल पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझे आजी- माजी सहकारी तेथे होते. उद्या सगळे एकत्र आले तर भावीपण होऊ शकतील. त्याविषयी येणारा काळच काय ते ठरवील. गमतीचा भागा सोडा… माझे प्रामाणिक मत असे आहे की, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावे, मात्र हल्ली राजकारणाला एक विकृत स्वरूप प्राप्त होते आहे, जे व्हायला नको. भाजप केंद्रात राज्य करते तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पण शेवटी आपण या मातीचे आहोत. त्यामुळे आपला अहंकार बाजूला ठेवून या राज्यासाठी आपल्याला आपल्या पदाचा वापर करून काय चांगले करता येईल ते केले पाहिजे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
पाटील प्रवेश करणार असे ऐकतोय
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात ‘मला माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांत कळेल’ असे वक्तव्य करून राजकीय चर्चा सुरू ठेवली होती. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे. पाटील हे या तीन पक्षांपैकी एकात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माझ्या कानावर आले आहे. म्हणूनच ते कदाचित तसे बोलले असावेत.
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर कोण काय म्हणाले?
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये हे मी कसे ठरवणार? त्यांच्या मनात काय आहे, हे मी कसं सांगू शकतो? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचे, राज्य कसे चालवायचे, समस्या काय याच्याच चर्चा होतात.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात, पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर?
– छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत लोकांमध्ये ताणतणाव आहे. थट्टामस्करी करण्याची त्यांची सवय आहे. आजही त्या पद्धतीने त्यांनी गंमत केली. शेवटी ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी कोणता निर्णय घ्यायचा ते त्यांच्या हातात आहे. पण महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्षे चालणार, असा विश्वास आहे. त्यांनीही तो बऱयाचदा बोलून दाखवला आहे.
– नाना पटोले, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष
राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सध्या सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत येण्याची शक्यता असेल. कारण काही लोक शिवसेनेत येणार आहेत. तशी गडबड गेल्या काही दिवसांत दिसत आहे. हे पाहता मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य महत्त्वाचे आहे.
– जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष
भाजपमध्ये सध्या नैराश्याचे वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात भाजपसह अन्य पक्षातील नेते, कार्यकर्ते प्रवेश करीत असून आणखी काही प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. त्या दृष्टीने ते आमचे भावी सहकारी ठरतात.
– बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री
मराठवाडय़ाला घसघशीत पॅकेज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडय़ासाठी घसघशीत पॅकेज जाहीर केले. संभाजीनगर जिल्हा परिषदेकडील 144 निजामकालीन शाळा आणि वर्गखोल्या नव्याने बांधण्याची घोषणा त्यांनी केली. पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे सांगतानाच संभाजीनगर – शिर्डी हवाई सेवेची घोषणा केली. तसेच मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर सर्व राजकारण बाजूला ठेवून माझे सरकार या निर्णयाच्या पाठीशी असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.






























































