मालाड दुर्घटना, मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस!

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हेदेखील उपस्थित होते.

बुधवारी रात्री दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी पालिकेसह संबंधित प्रशासनांना बचावकार्यासह आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, पालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचावकार्य करीत होते. तर आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी कांदिवली पश्चिमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर करतानाच सर्व उपचार सरकारकडून मोफत होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील जखमींच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला. यावेळी उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, उपआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त शंकर विश्वासराव आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या