समृद्धी महामार्गाने मेपर्यंत शिर्डीपर्यंत प्रवास सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

येत्या मे महिन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम शिर्डीपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर येणाऱ्या वर्षात मुंबईपर्यंत हा मार्ग वाहतूकीसाठी सुरू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या शिवणी रसलापूर येथे समृद्धी महामार्गाचे पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. बाळासाहेबांच्या नावाने असलेल्या समृद्धी महामार्ग देशातील सर्वात चांगला महामार्ग म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण प्रथमच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग प्रकल्पाची पाहणी करायला आलो आहोत. या प्रकल्पाचे काम उत्तमप्रकारे सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा त्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल. हा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असे काम आपण केलेले असेल, असेही ते म्हणाले.

देशभरात असलेल्या कोरोनाच्या संकटातही राज्यातील महामार्गाचे काम सुरू होते. आपण हे काम गतीने करतो आहे. लॉकडाऊनच्या काळात कामात खंड पडेल किंवा कामाची गती मंदावेल, असे वाटले होते. मात्र, त्या काळातही प्रकल्पाचे काम गतीने सुरू होते. त्यामुळे मला खात्री आहे, येत्या 1 मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकू, असे त्यांनी सांगितले. या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालले आहे. सर्वतोपरी काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करत आहोत. येत्या 1 मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या 1 मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवणी रसलापूर येथे रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यांच्यासोबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर व काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या