
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच असे मुख्यमंत्री म्हणाले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सात डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आरोग्य मंत्र्यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या निर्णयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना देखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे कोविडची बाधा होण्याची शक्यता कमी होईल आणि कोविड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.































































