कोरोनाचे संकट समूळ नष्ट होवो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्री अंबाबाई चरणी प्रार्थना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. कोल्हापुरातही छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर)मध्ये सुसज्ज कोरोना वॉर्ड उपलब्ध झाला आहे. मात्र, याचा वापर करण्याची वेळ येऊ नये. नागरिक आनंदी आणि निरोगी राहोत. कोरोनाचे हे संकट समूळ नष्ट होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री अंबाबाईकडे केली.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे अत्याधुनिक साधनसामग्रीसह 14 बेडचा कोरोना वॉर्ड  क्रोम क्लिनिकल रिसर्च अॅण्ड मेडिकल टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देणगी रूपाने तयार करून दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी ऑनलाइन लोकार्पण केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ‘सीपीआर’मध्ये लोकसहभागातून सुसज्ज कोरोना वॉर्ड उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘क्रोम’चे कार्यकारी संचालक धनंजय लाड यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधा शासन आणि लोकसहभागातून अधिक सक्षम केल्या जात आहेत. यासाठी समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान लाभत आहे. कोरोनाचे संकट कदाचित गंभीर झाल्यास आरोग्य सुविधा कमी पडू नयेत यादृष्टीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभ्या केल्या जात आहेत. मुंबईत तर देशातील सर्वात मोठे कोविड हॉस्पिटल उभे केले आहे. तसेच, राज्याच्या प्रत्येक जिल्हय़ात आणि तालुक्यातही आरोग्य सुविधा सक्षम आणि सुसज्ज केल्या जात आहेत.

आरोग्यविषयक कामात कसूर होणार नाही!

यापुढील काळात कोरोनाचे संकट अधिक वाढण्याची शक्यता गृहित धरून शासन आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष आणि सजग आहे. कोरोनाच्या युद्धात प्रशासकीय यंत्रणा विशेषतः आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत आहे. यापुढेही आरोग्यविषयक कामात कसूर होणार नाही. उलट कोरोना व्हायरस नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच आपणच माणसांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

कोरोनाने चांगल्या गोष्टीही दाखविल्या

कोरोनाने वाईट गोष्टी दिल्या त्याबरोबरच चांगल्याही गोष्टी दाखविल्या. आरोग्याकडे आणि पुटुंबाकडे कोरोनाने बघायला शिकवले. राज्यात सर्वत्र आरोग्याच्या सुविधा वाढवायला लागलो आहोत. मुंबईत मोठे कोविड हॉस्पिटल उभारण्याबरोबरच केंद्राकडे आणखी व्हेंटिलेटरची मागणी केली आहे. पीपीई किट, एन-95 मास्कच्या उपलब्धतेवरही अधिक भर दिला आहे.

संकटाशी लढणे महाराष्ट्राच्या रक्तातच!

कोरोनामुळे माणसा-माणसात अंतर ठेवणे गरजेचे असले तरीही एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा महाराष्ट्रातील जनतेने जोपासली आहे. एप्रिलमध्ये रक्ताचा तुटवडा होता. त्यावेळी शासनाच्या वतीने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर राज्यातील जनतेने मोठय़ा प्रमाणावर रक्तदान केल्याने रक्ताची ही टंचाई दूर झाली. अशा पद्धतीने संकटाशी लढणे महाराष्ट्राच्या रक्तात असल्याचेही त्यांनी सांगितले. गेले अडीच-तीन महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू आहे; मात्र लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवून  ‘मिशन बिगिन अगेन’ने पुन्हा सुरुवात केल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.