
राजकारणाचे डावपेच चालतच राहतील. पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे लक्ष द्या. राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. त्यामुळे आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. कोरोना आहेच, शेतकऱ्यांच्या पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे वारकऱ्यांना सुविधा कशा मिळतील हे पहा, जनतेशी संबंधित महत्त्वाची कामे थांबवून ठेवू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, सचिवांच्या बैठकीत दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोरोना, आषाढी वारीतील सुविधा, पेरण्या, आपत्ती व्यवस्थापन यांचा आढावा घेतला. यावेळी आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात एकाच दिवशी सात ते आठ लाख वारकरी एकत्र आल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारीत सहभागी दिंडीप्रमुखांशी संवाद साधण्याची सूचना केली. त्यांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य समजावून द्या. वारीत वारकरी मंडळी देहभान हरपून सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मास्क वापरणे, वारीच्या मार्गावर स्वच्छता, शक्य आहे तिथे शौचालयांची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा याबाबतीत जाणीवपूर्वक काळजी घेण्यात यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच अन्य विभागांचे सचिव उपस्थित होते.
पेरण्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा
राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबतही कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. राज्यात 13 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच सुमारास 23 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. शुक्रवार, 1 जुलै रोजी ‘कृषी दिन’ आहे. त्याआधी 25 जून ते 1 जुलै हा ‘कृषी संजीवनी सप्ताह’ही आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गावागावांमध्ये कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगितले.
संभाजीनगरमधील पाणीपुरवठा योजना वेगाने पूर्ण करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती घेऊन ती अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
मास्कसक्तीची वेळ येऊ नये
बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने वाढू लागला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांत मास्क घालणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांपर्यंत कोरोना पोहचू नये म्हणून अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे. काळजी न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, मास्कसक्तीची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. संसर्गाचा वेग रोखण्यासाठी रेल्वे प्रवासात मास्कसक्ती करावी किंवा नाही याबाबत तसेच अन्य कोरोना नियमावली लागू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
आपत्ती नियंत्रण यंत्रणांनी सतर्क राहावे
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबतदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी कोकण विभागातील तयारी आणि सज्जता याबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी माहिती दिली. दरडप्रवण नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळीच देण्यात याव्यात. रत्नागिरी, महाड, खेड आणि चिपळूण परिसरांबाबत आतापासूनच विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी उपाययोजना, सॅटेलाइट- रेडिओ संपर्क यंत्रणा, पाटबंधारे विभागाची पाणी सोडण्याबाबत तसेच आपत्कालीन परिस्थितीत सायरनद्वारे सूचना देण्याची यंत्रणा, वापरण्यात येणाऱ्या बोटींची चाचणी याविषयीही प्रशासनाकडून यावेळी माहिती देण्यात आली.































































