
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग ही रोरो बोटसेवा 15 मार्चपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरीसेवा आणि मांडवा रो पॅक्स टर्मिनलचे उदघाटन रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी मांडवा येथे सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांनी मांडवा येथे जाऊन पाहणी केली.
भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग ही रो पॅक्स फेरीसेवा कधी सुरू होणार असा प्रश्न सर्व प्रवाशांना पडला होता. अखेर ही फेरीसेवा 15 मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. 11 मार्च रोजी ग्रीसवरून आणलेल्या प्रोटो प्रोसेस एक्सव्ही या अत्याधुनिक फेरी बोटीची चाचपणी एमएमबी, बीपीटी, बोट नोंदणी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली होती. यावेळी भाऊचा धक्का ते मांडवा अलिबाग दरम्यान ही चाचणी घेण्यात आली. फेरी बोटीची ही चाचणी यशस्वी झाली असल्याने 15 मार्चचा मुहूर्त नक्की झाला आहे. एम2एम फेरीस कंपनी ही फेरीसेवा देणार आहे.
मांडवा येथे रो रो फेरीसेवा व रो पॅक्स टर्मिनलचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नौकानयन राज्यमंत्री मनसुख मंडवीया, बंदरे व मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख, पालकमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, राजीप अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हयातील आमदार उपस्थित राहणार आहेत.
रोरो सेवेची ठळक वैशिष्ट्ये
– एकाचवेळी 500 प्रवाशी व 150 वाहने वाहून नेली जाऊ शकतात
– भाऊचा धक्का ते मांडवा 45 मिनिटात प्रवास
– सर्व सुविधायुक्त प्रवासी टर्मिनल
– इंधन खर्च, वेळेत बचत, पर्यावरणस्नेही व आरामदायी प्रवास

























































