सीएनजी आणि एलपीजी किट आता बीएस6 वाहनांमध्येही बसवता येणार, सरकारने दिली मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

BS-VI वाहनांमध्ये आता CNG आणि LPG किटच्या रीट्रोफिटमेंटला सरकारने परवानगी दिली आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या बीएस-6 इंजिन कारमध्ये सीएनजी किंवा एलपीजी किट बसवता येणार आहे. यापूर्वी फक्त BS-IV इंजिन असणाऱ्या वाहनांमध्येच गॅस किट बसवण्याची परवानगी होती. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की BS-VI गॅसोलीन वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किटचे रिट्रोफिटमेंट करता येईल. तसेच 3.5 टन पेक्षा कमी डिझेल इंजिन बीएस-VI वाहनांना सीएनजी किंवा एलपीजी इंजिनमध्ये बदलता येईल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असेही म्हटले आहे की CNG हे पर्यावरणास अनुकूल इंधन आहे. ते पेट्रोल डिझेल इंजिनच्या तुलनेत कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोकार्बन्स, कण आणि धूर यांचे कमी उत्सर्जन करते. त्यामुळे या संदर्भात चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

गेल्या काही काळात देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे लोकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. त्याचवेळी, जर बीएस-6 इंजिन असलेली वाहने जुनी असतील तर त्यांच्या मायलेजवरही परिणाम होईल परिणामी पेट्रोल आणि डिझेलसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत सीएनजी आणि एलपीजी किट तुमच्यासाठी आधार ठरू शकतात. CNG आणि LPG मुळे कमी खर्चात जास्त अंतराचा प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

वेगाने वाढणारे वायू प्रदूषण लक्षात घेऊन दिल्ली सरकारच्या एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने नवीन धोरण तयार केले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, येत्या 1 ऑक्टोबरपासून BS-IV इंजिन असलेल्या डिझेल गाड्यांवर बंदी घातली जाऊ शकते. अशा परिस्थितीत या वाहनांमध्ये सीएनजी आणि एलपीजी किट देखील वापरता येऊ शकते.