
मंत्रालय राज्य सेवा हक्क आयोगातील कक्ष अधिकारी आणि मंत्रालय बँकेचे संचालक कॉ. कृष्णा कोयंडे (57) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राजस्थान जैसलमेर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेले कॉ. कोयंडे हे तरुणपणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या माध्यमातून भांडुप परिसरात खूप सक्रिय होते. विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. ते उत्तम कलावंत होते. लोकमंच या सांस्कृतिक संस्थेतर्फे नाटक चळवळीतही त्यांनी काम केले. सेवाभावी स्वभावामुळे ते मंत्रालयातील कर्मचारीवर्ग तसेच बोरिवलीतील सिंधुदुर्ग सहकारी गृहनिर्माण संस्थेत लोकप्रिय होते.




























































