राज्यातील सहकार चळवळीला बळ मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सहकार चळवळीला आणखी बळ मिळणार आहे. सहकार चळवळीची निकोप वाढ होण्यासाठी सहकारी संस्थांचे सभासद, कर्मचारी आणि संचालकांना सहकाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने याआधी सात संस्थाना शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मंजुरी दिलेली असतानाच आज महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबई या दोन संस्थांना राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मंजुरी दिली आहे.

राज्यभरात जवळपास 2 लाख 10 हजार सहकारी संस्था असून त्यांची सभासद संख्या साडेपाच कोटींच्या घरात आहे, तर संचालकांची संख्या 25 लाख असून साडेतीन लाख कर्मचारी आहेत. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना वेळोवेळी सहकाराचे प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. त्यानुसार सदरचे प्रशिक्षण देण्यासाठी सरकारकडून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे, विठ्ठलराव विखे पाटील प्रबंध संस्था पुणे, धनंजयराव गाडगीळ प्रबंध संस्था नागपूर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड ट्रेनिंग सेंटर, यशदा, कृषी विद्यापीठ पुणे, सहकार भारती पुणे, जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे या सात सहकारी संस्थांना राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मंजुरी दिली आहे. मात्र सहकारी संस्थाची सभासद, कर्मचारी आणि संचालकांची संख्या पाहता सरकारने आणखी दोन संस्थांना शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून मंजुरी दिली आहे. त्यांच्यावर सहकार आयुक्तांचे नियंत्रण असणार असून त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गाचा प्रत्येक तीन महिन्यांनी आढावा घेणार आहे.