रत्नागिरीत समुद्राला उधाण, नारळांची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान

पावसाच्या पाण्याने खाडीत पुराच्या पाण्याची वाढ झालेली आहे. असे असताना  त्यातच समुद्राला आलेल्या  उधाणाच्या भरतीच्या लाटांच्या तडाख्याने कोळथरे खालच्या भंडारवाड्यातील नारळाची झाडे उन्मळून पडले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दापोली तालुक्यातील कोळथरे गावात खालच्या नावाचा भंडारवाडा आहे. या भंडारवाड्यातील लोक हे  अगदी समुद्राच्या काठावरच पूर्वापार राहत आहेत. वर्षोनुवर्ष परपरांगत समुद्राच्या काठावर राहणार्‍या ग्रामस्थांनी आपल्या वस्ती आणि नारळी बागांच्या संरक्षणासाठी शासनाकडे संरक्षण बंधार्‍याची मागणी केली होती. परंतु ती अद्याप पूर्ण झालेली नाही.

अमावास्या तसेच पौर्णिमेला समुद्राला येणार्‍या उधाणाच्या भरतीच्या लाटांचे पाणी हे वस्तीत शिरते. त्यामुळे निवासी घरांसह नारळांच्या झाडांना या उधाणाचा फटका बसून  येथील रहीवाशांचे खुपच मोठे आर्थिक नुकसान होते.

कोळथरे खालच्या भंडार वाडा वस्तीला संरक्षण बंधारा व्हावा यासाठी ग्राम पंचायतीच्या स्तरावरून तसेच ज्यांना  नुकसानीची झळ बसते त्या रहिवाशांनी दापोलीस्थित सरकारी कार्यालयाचे अक्षरशः उंबरठे झिजवून झाले आहेत. मात्र प्रशासनाच्या अधिकार्‍यांना ग्रामस्थांच्या अर्ज विनंत्यांकडे लक्ष दिले नाही. हा प्रश्न सुटला नसल्याने अजूनही ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या