
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गावरील भुयारीकरणाचा 32 वा टप्पा आज पूर्ण झाला. सिद्धिविनायक ते दादर मेट्रो स्थानक असे 1.10 किलोमीटरच्या भुयाराचे खोदकाम यशस्वीरीत्या पार पडले. कृष्णा-2 या टनेल बोअरिंग मशिनने (टीबीएम) हे भुयारीकरण करण्यात आले.
16 डिसेंबर 2019 रोजी या टप्प्याच्या भुयारीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. कृष्णा-2 या टीबीएमने 295 दिवसांमध्ये 791 रिंग्सच्या सहाय्याने हे अप-लाइन भुयारीकरण पूर्ण केले. ‘दादर मेट्रो स्थानक हे रहिवासी इमारती आणि व्यापारी आस्थापने यांच्यामध्ये बांधण्यात आले असून मुंबई मेट्रो-3 मार्गावरील ते एक महत्त्वाचे स्थानक आहे. त्यामुळे भुयारीकरणाचा हा टप्पा म्हणजे एक आव्हानच होते’ असे मुंबई मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यावेळी म्हणाले. याप्रसंगी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हेसुद्धा उपस्थित होते. या कामाचे कौतुक करतानाच, मेट्रो-3 मार्गामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये सकारात्मक बदल होणार असून हे एक वरदान ठरणार आहे असे याप्रसंगी कुंभकोणी म्हणाले.
मेट्रो-3 मार्गावरील पॅकेज-4 मध्ये दादर, सिद्धिविनायक आणि शितलादेवी या स्थानकांचा समावेश आहे. दादर स्थानकाचे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण 94 टक्के भुयारीकरण आणि 95 टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे असे मेट्रो रेल महामंडळाकडून सांगण्यात आले.



























































