
सामना प्रतिनिधी । नाशिक
नाशिककरांनो, हुडहुडीचा सामना करायला सज्ज व्हा. आता गुलाबी थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. तुमच्या घरातील कपाटात, बॅगेत, माळावर जपून ठेवलेले स्वेटर, मफलर, कानटोप्या बाहेर काढा. कारण आठवडाभरात किमान तापमान 7 अंशांनी घसरले आहे. निफाडमध्ये आज 10.6 तर नाशिकमध्ये 11.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले.
नाशिक शहरात 6 नोव्हेंबर रोजी किमान 18.7 व कमाल 33.7 अंश सेल्सिअस तापमान होते. आठ दिवसात किमान तापमानात तब्बल 7 अंशांनी घसरण झाली आहे, तर कमाल तापमान अवघ्या 1 अंशाने खाली आले आहे. रविवारी किमान 13.6, कमाल 32; तर सोमवारी किमान 12.2, कमाल 32.4 तापमानाची नोंद झाली. आज किमान तापमान 11.5 नोंदविले गेले, तर कमाल तापमान 32.5 होते.
निफाडजवळील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात आज या मोसमातील राज्यातील नीचांकी 10.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. येथे कमाल तापमान 32.6 होते. काल येथे किमान 11.4, कमाल 32 तापमानाची नोंद झाली.
जिल्ह्यात अजूनही कमाल तापमान 32 ते 33 अंशांच्या घरात असल्याने दिवसा ऑक्टोबरसारखेच ऊन आहे, त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुढील पाच दिवसात नाशिकमध्ये किमान तापमान 10 अंशांवर, तर कमाल तापमान 31 अंशावर घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

































































