दातावर दात आपटणार! थंडीचा कडाका आणखी चार दिवस कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

थंडीच्या लाटांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा व्यापला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान दहा अंशाच्या खाली घसरले आहे. येत्या 24 तासांत त्यापेक्षाही कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागपूरचा पारा सर्वात खाली 4 अंशापर्यंत घसरला असून त्यापाठोपाठ सहा अंश सेल्सियस तापमानामुळे पुणेकर अक्षरशः गारठून गेले आहेत. गारठलेल्या माणसांनी देवांना थंडी लागू नये म्हणून अनेक ठिकाणी गणपतीच्या मूर्तींवर शाल, घोंगडय़ा पांघरल्या आहेत.

थंडीने नागपूर आणि निलंग्यात शनिवारी रात्री 3 बळी घेतले. नागपूरच्या संविधान चौक आणि बैद्यनाथ चौकातील फूटपाथवर झोपलेल्या दोघांचा थंडीमुळे मृत्यू झाला. त्यांची नावे समजू शकली नाहीत तर निलंगा तालुक्यातील साकरी येथे रात्री शेतवस्तीवर मुक्कामास गेलेल्या व्यंकट बाजीराव जाधव (62) या शेतकऱ्याचाही थंडीने बळी घेतला.

मुंबईत थंडीची तीव्रता पुढील दोन दिवसांत आणखी वाढेल आणि कुडकुडी, थरथरी भरणारी थंडी जाणवेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. थंडीमुळे मुंबईत स्वेटर आणि कानटोप्यांना मागणी वाढली आहे. थंडीचा परिणाम लोकलमध्येही जाणवत असून पहाटे आणि सूर्यास्तानंतर विंडो सीट रिकाम्या राहत आहेत.

राज्यातल्या प्रमुख शहरांतील किमान तापमान
नगर 4.5 , जळगाव 6.6, मालेगाव, नाशिक 7, सातारा 9.4, धाराशीव 8.2, संभाजीनगर 6.8, परभणी-नांदेड 7, अकोला 5.9, अमरावती 8.4, बुलढाणा 7.5 , चंद्रपूर 8.2, गोंदिया-वर्धा 7.5, महाबळेश्वर 7 अंश सेल्सियस