
सामना प्रतिनिधी । परभणी
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट आली असून, मंगळवारी जिल्ह्याचा पारा ६.४ अंशापर्यंत उतरल्याने संपूर्ण जिल्हा गारठला आहे. दरम्यान, डिसेंबरच्या शेवटच्या आवठड्यात सलग चार दिवसांपासून परभणी जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली होती. गुरुवार, २७ डिसेंबर रोजी अक्षरश: परभणीचा पारा ३ अशांवर गेल्याची नोंद वनामकृविच्या हवामान विभागाने केली. त्यामुळे दररोज सकाळी धुकेच धुके दिसत असल्याने रस्ता दिसणे देखील कठीण झाले होते. सध्या परभणी जिल्ह्यात थंडीची लाट पुन्हा आली असून तापमानामध्ये मोठी घट होत आहे. आणखी चार-पाच दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात ९.५ इतकी निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे थंडीचा कडाका जाणवणार नाही, असे भाकीत सध्या खोटे ठरत आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत. त्याचबरोबर शहरी भागातही उबदार कपड्यांची मागणी मोठ्या प्रामणात वाढली असून अनेकजण घराबाहेर पडणे देखील पसंत करत नाहीत. संपूर्ण मराठवाड्यात थंडीचा पट्टा निर्माण झाल्याने परभणीला चांगलीच हुडहुडी भरली आहे. सकाळची मार्निंग वॉकची संख्याही पुन्हा एकदा रोडावली आहे. रात्री ७.३०नंतर सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. वाहनांची वर्दळही कमी झालेली पहावयास मिळत आहे. गेल्या १५ दिवसांपासून परभणी दिवसेंदिवस गारठत चालली आहे. आजचे तापमान ६.४ अंशावर आले आहे. काही नागरिक या थंडीमुळे सर्दी, खोकला, तापीने बाधीत झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अधिक राहिले आहे. दोन आठवड्यापूर्वी तर जिल्ह्यात पंधरा वर्षांतील विक्रमी ३ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर संपूर्ण आठवडाभरा तापमानात घट होत राहिली. मागील आठवड्यात मात्र तापमनात वाढ झाल्याने जिल्हावासियांना थंडीपासून सुटकारा मिळाला होता. मात्र मंगळवारी पुन्हा तापमनात घट झाली. विशेष सोमवारी १४ अंशावर असणारे किमान तापमान मंगळवारी मात्र ६.४ अंशापर्यंत घसरल्याने अचानक थंडीत मोठी वाढ झाली आहे. सकाळी वातावरणात गारवा निर्माण झाला होता. थंड वारे वहात असल्याने झोंबणारी थंडी जाणवत होती.
उत्तरेकडील वाऱ्याचा परिणाम
जिल्हयात सध्या उत्तरेकडून पूर्वेकडे वारे वहात आहेत. या वाऱ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या थंड वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे डॉ.के.के. डाखोरे यांनी सांगितले.


































































