आता कसं वाटतंय! गार गार वाटतंय !! मुंबईतील गारठा वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कडकडीत थंडी पडायला लागली आहे. गुरुवारी मुंबईकरांना संध्याकाळनंतर जरा जास्तच थंडी वाजायला लागली होती. गुरुवारी सांताक्रूझ इथे नोंदवण्यात आलेल्या तापमानाकडे नजर टाकल्यानंतर त्यात 4.4 डिग्री सेल्सियसची घट झाल्याचे दिसून आले. बुधवारी सांताक्रूझ इथे 20.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुरुवारी इथे 16.4 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले होते. कुलाबा इथे मात्र तापमानात किंचित घट पाहायला मिळाली. बुधवारी इथे 21 डिग्रीस सेल्सियस तापमान होतं जे गुरुवारी 20.2 डिग्री सेल्सियस इतके नोंदवण्यात आले.

पुढच्या सात दिवसांसाठी हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलाय त्यानुसार मुंबईत 16 ते 18 डिग्री सेल्सियस इतकं तापमान राहण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांचा विचार करता सगळ्यात कमी तापमान हे बोरिवली इते नोंदवण्यात आलं इथे 14.4 डिग्री सेल्सियस इतके तापमान होते. पवई इथे 14.9 डिग्री सेल्सियस इतके तापमान होते तर गोरेगांवमध्ये १५ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तरेकडून वाहात असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईमध्ये थंडावा वाढल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.