नामवंत कॉलेजांत प्रवेशाचे टेन्शन कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विभागाचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. यंदा 1 लाख 6 हजार विद्यार्थी 75 टक्क्यांच्या पुढे, तर 10, 764 विद्यार्थ्यांना 90 टक्केहून अधिक गुण आहेत. केंद्रीय बोर्डांचा निकाल जाहीर झाल्यानंतर या बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांची यात भर पडणार आहे. त्यामुळे मुंबईतील नामवंत कॉलेजांत प्रवेश मिळविण्याचे टेन्शन विद्यार्थ्यांमध्ये कायम आहे.

दरवर्षी मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एसएससी आणि बिगर एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळते. बहुसंख्य कॉलेजमधील जागा या पहिल्या दोन गुणवत्ता यादीतच फुल्ल होतात. काही मोठय़ा कॉलेजमध्ये विनाअनुदानित जागेसाठीही चुरस पाहायला मिळत आहेत. अकरावीचा प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थी गेल्या वर्षीची कटऑफ पाहून कॉलेज पसंतीक्रम ठरवत असतात. यात सीबीएसई आणि आयसीएसईच्या निकालाचा टक्कादेखील पाहायला मिळतो. मात्र यंदा सर्वच मंडळाचे निकालच अद्याप जाहीर न झाल्याने कटऑफ काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही.