दोन लाखांसाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण, कॉलेज विद्यार्थिनीने पळवले पण परत आणून सोडले

शिवडी-कोळीवाडा येथील होळी मैदानासमोरून अपहरण झालेला तीन वर्षांचा मुलगा अखेर सहीसलामत त्याच्या आईच्या कुशीत परतला. मुलाच्या आईच्या ओळखीच्या असलेल्या कॉलेज विद्यार्थिनीने त्या मुलाचे दोन लाखांच्या लालसेपोटील अपहरण केले होते. पण प्रकरण फिसकटले आणि  तरुणीने मुलाला पुन्हा आणून सोडले.

सानिका वाघमारे (18) असे त्या आरोपी तरुणीचे नाव आहे. सानिकादेखील शिवडी-कोळीवाडा परिसरात राहते. शिवडी- कोळीवाडा परिसरात राहणारा तीन वर्षांचा चिमुकला सोमवारी दुपारी घरासमोरील मोकळय़ा मैदानात खेळत असताना बेपत्ता झाला. त्याच्या आईने त्याचा परिसरात सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने वडाळा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास तसेच खबऱ्यांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. दरम्यान, दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती त्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आला आणि एका तरुणीला हा मुलगा सापडल्याने तिने याला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास मला सांगितले असे कांबळे नावाच्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी त्या तरुणीचा माग काढला असता तिचे नाव सानिका वाघमारे असे असल्याचे समजले. दरम्यान, परिसरात मुलाचा शोध घेत असताना मुलगा सानिकासोबत होता अशी माहिती मिळाली होती. शिवाय मुलाची आई सानिकाला ओळखत असल्याने आईनेदेखील तिला मुलगा कुठेय याची फोन करून विचारपूसदेखील केली होती. त्यामुळे सानिका हाती लागल्यानंतर मुलाच्या अपहरणनाटय़ावर पडदा पडला.