
कोरोना संकटामुळे गेली अनेक महिने बंद असलेली देशातील महाविद्यालये येत्या 2 नोव्हेंबरपासून अनलॉक होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरणास सुरुवात झाली आहे. कोरोना संकट अजूनही पूर्णपणे दूर न झाल्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा कोणत्याही पध्दतीने शिकवण्याची मुभा विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिली आहे. त्याचप्रमाणे 50 टक्के विद्यार्थ्यांनाच बोलवण्याची अटही ठेवली आहे.
महाविद्यालये सुरू करताना काय काळजी घ्यावी, याबाबत यूजीसीकडून लवकरच गाईडलाईन्स जारी केल्या जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग केल्यानंतरच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक ठेवले जाणार आहे. महाविद्यालयात डॉक्टरांचे पथक आणि अॅम्ब्युलन्स तैनात करण्याच्याही सूचना यूजीसीकडून दिल्या जाऊ शकतात. याशिवाय महाविद्यालयात कोणाच्याही प्रकृतीबद्दल तक्रार उद्भवली तर त्याला ठेवण्यासाठी एक आयसोलेशन रुमही बनवली जाणार आहे.
महाविद्यालय उघडण्यास अडचण असेल तर ऑनलाइन शिकवणी
महाविद्यालय सुरू करण्यास काही अडचण उद्भवत असेल तर ऑनलाइन शिककणी घ्या, अशी मुभा यूजीसीने दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत 2 नोव्हेंबरपासून नवे सत्र सुरू झाले पाहिजे. ठरलेल्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.
प्रवेश प्रक्रियांना 31 ऑक्टोबरची डेडलाइन
यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरची डेडलाइन दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यावर यूजीसीने या राज्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व परीक्षा पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यानंतर या राज्यांमध्येही नव्या सत्राच्या शिकवणीला सुरुवात होईल.




























































