महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून ‘मिशन विघ्नहर्ता’ ऍप, अनंत चतुर्दशीला मूर्ती संकलनासाठी उपयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. अनंत चतुर्दशीला मूर्ती विसर्जनाला होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिशन विघ्नहर्ता ऍप व संकेतस्थळ तयार केले आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या मदतीने मूर्ती संकलन शक्य होणार असल्याने हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या सर्वत्रच कोरोना संसर्गाचे संकट कायम आहे. यावर गर्दी टाळणे हाच एकमेव पर्याय असल्याने यावर्षी त्याचे पडसाद सर्वच उत्सवांवर जाणवत आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर विसर्जनाप्रसंगी गर्दी कमी करणे, नदी प्रदूषण थांबवणे या उद्देशाने नाशिक येथील संदीप फाऊंडेशन, के. के. वाघ महाविद्यालय, मेट एज्युकेशन व बीवायके महाविद्यालयातील काही विद्यार्थी एकत्र आले. ओम कासार, अभिषेक पाटील, भूषण चौधरी, संयुक्ता कांबळे, अंजली मोरे, एकता जैन, कार्तिक वाघ, वैभव मंडलिक, नैमिष इंदुरकर व ऋतुराज बुवा यांनी ‘मिशन विघ्नहर्ता ऍप’ व संकेतस्थळाची निर्मिती केली.

परिसरातील गणेश मंडळांच्या मदतीने या ऍपद्वारे गणेश भक्तांकडून मूर्ती संकलित करण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी त्यांनी पहिल्या मानाच्या पाच गणेश मंडळांशी संपर्क साधला असून त्या मंडळांनी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. शहरात दीड दिवसाचा गणपती विसर्जन करणाऱयांची संख्या चार हजारांच्या आत आहे, त्यामुळे त्या दिवशी मूर्ती संकलन महापालिकेच्या नियमित संकलन केंद्रांवर होईल. मात्र पाचव्या, सातव्या दिवशी तसेच गौरींबरोबर होणाऱया विसर्जनासाठी ऍपवर केंद्रांचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील संबंधित भागातील गणेश मंडळांशी चर्चा सुरू आहे.

या ऍपबाबत महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. सहाही विभागाच्या अधिकाऱयांशीही बैठक पार पडल्याचे कासार याने सांगितले. महापालिकेच्या सहकार्याने स्मार्ट सिटी कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून शहरात एकत्रितरीत्या हा प्रयोग राबविण्याचा मानस असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

ऍपची वैशिष्टय़े
या ऍपद्वारे गणेशभक्तांना त्यांच्या घराजवळील मंडळ शोधता येईल. मूर्तीदानासाठी लांब जाण्याची गरज भासणार नाही. मंडळांसाठी त्यावर एक लॉग इन पेज देण्यात आले आहे. त्याद्वारे संकलित होणाऱया मूर्तींची संख्या समजू शकेल. मोजक्या संकलन केंद्राच्या सहाय्याने योग्य व अचूक काम शक्य आहे.