
राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने राज्यातील विद्यापीठे, त्याअंतर्गत येणाऱया महाविद्यालयांतील शिक्षण हे ऑनलाइन सुरू करावे तसेच वसतिगृहेही बंद करून त्यावर मर्यादा आणल्या जाव्यात असा सूर आज राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीतून आला.
महाविद्यालयांबाबत आज निर्णय
बैठकीनंतर उदय सामंत यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेत यासंदर्भात बुधवार 5 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठीची माहिती सामंत यांनी एक ट्विट करून दिली.
मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असून तातडीने पदवी महाविद्यालयांतील शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू केले जाईल. काही विद्यापीठांच्या हिवाळी अणि इतर सत्राच्या परीक्षा सुरू आहेत, त्यालाही इतर पर्याय देण्याचे आदेश होण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱया तसेच उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱया सर्व वसतिगृहावरही निर्बंध घातले जाण्याची शक्यता अधिकारी सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
































































