अलौकिक श्रीसंतदर्शन : परीटबाबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

सर्वसामान्यांच्या जगण्यातील आणि विचारांतील मलीनता स्वच्छ करणाऱया ‘परीटबाबा’ या सत्पुरुषाविषयीचा हा लेख.

पुणे शहराच्या दक्षिणेस सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले तीर्थक्षेत्र कोंढणपूर हे ‘पवार’ घराण्याचे मूळ वस्तीस्थान. डोंगराळ भाग, आडबाजूस असल्यामुळे बेताची वस्ती आणि उदरनिर्वाहाच्या साधनांची वानवा यांमुळे इथल्या ग्रामस्थांची स्थिती बेतासबात होती. शेती व मजुरी यातून मिळणारा पैसा पोटाची भूक भागविण्याकरिता पुरेसा नसल्याने धोंडीबा पवार जड अंतःकरणाने कोंढणपूर सोडून पुणे शहरात आले. येथे त्यांनी बांधकामावर मजुरी केली. त्यामुळे पत्नीसह पाच मुलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघाला.

पुढे धोडीबांच्या पश्चात त्यांचा ज्येष्ठ पुत्र विठोबा कुण्या परिटाकडे महिना नऊ रुपये पगारावर नोकरीस लागला. अंगमेहनतीच्या कामामुळे विठोबांची दमछाक होत असे, मात्र त्यांनी हळूहळू या क्षेत्रात जम बसवला अन् स्वतःचा लॉण्ड्री व्यवसाय सुरू केला. त्यांना फर्ग्युसन कॉलेज वसतिगृहातील मुलांच्या कपडे धुलाईचे काम मिळाले. व्यवसाय बरकतीस आला मात्र प्रापंचिक आघाडीवर पीछेहाट झाली. मूल जन्मास घालून पत्नी निवर्तल्यावर त्यांनी बऱयाच वर्षांनी दुसरे लग्न केले, मात्र संसारसुखाचा पुरेसा उपभोग घेण्याआधीच विठोबा मरण पावले. सावत्र आई आणि मुलगा ग्यानबा यांचे फारसे सख्य झाले नाही. कालांतराने ग्यानबांचे लग्न धोंडाबाईंशी झाले.

आनंदापाठोपाठ येणाऱया दुःखाच्या पाठशिवणीच्या खेळाची परंपरा पवार घराण्यात अबाधित राहिली. धोंडाबाईंना चार मुले झाली आणि दगावलीदेखील. एकही मूल वर्षभरसुद्धा जगू शकले नाही. प्रापंचिक ओढगस्ती दिसामासाने वाढती झाली. अशातच सन 1886 च्या श्रावण महिन्यातील नागपंचमीस धोंडाबाई पुन्हा एकदा प्रसूत झाल्या. मुलगा जन्मला. रीतीरिवाजाप्रमाणे नामकरण सोहळा पार पडला. नवजात बालकाचे नाव ‘लक्ष्मण’ ठेवण्यात आले. समग्र ‘रामायण’ व्यापणारा ‘लक्ष्मण’ जसा शेषाचा अवतार होता त्याचप्रमाणे नागपंचमीला जन्म घेतलेला हा लक्ष्मण पुढे कलियुगात घडणारे ‘रामायण’ व्यापण्यास सज्ज झाला. पवारांच्या वंशवेलीवर जन्मलेला ‘लक्ष्मण’ त्याच्या वयाचा एक वर्षाचा टप्पा पार करूनही सुदृढ, भरभक्कम राहिला इतकेच नाही तर कालांतराने त्याच्या पाठी जन्मलेली पाच मुले (एका मुलाचा अल्पवयी मृत्यू वगळता) धडधाकट राहिली आणि पुढे व्यवस्थित आयुष्य जगली.

लक्ष्मण वयाने वाढता झाला तसा त्याच्या स्वभावातील समंजसता आणि वृत्तीमधील परिपक्वता वाढती झाली. घरची परिस्थिती गरिबीची असली तरी लक्ष्मणाने कसलीही कुरकुर न करता हसतमुखाने स्वीकारली. त्याच्या सहनशीलतेला कष्टाळूपणाची जोड लाभली. धोंडाबाई माऊलीसोबत त्याने परिटकामाची धुरा खांद्यावर घेतली अन् काबाडकष्ट करून घराला ऊर्जितावस्था व भावंडांना स्थैर्य मिळवून दिले. लक्ष्मणाला शालेय शिक्षण मिळाले नसले तरी जगातील अनुभवाची शिदोरी त्याला योग्य ‘धडा’ शिकवती झाली. पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्ष्मण विविध प्रकारची अंगमेहनतीची कामे करीत असे.
प्रपंचाच्या चाकाला आपले आयुष्य जुंपून घेणाऱया लक्ष्मणाला वयाच्या सोळाव्या वर्षी जेजुरीला जाण्याचा योग प्राप्त झाला. येथून त्याचे भाग्य बदलत गेले. प्रपंचात रमलेल्या लक्ष्मणाला ‘अध्यात्म’ खुणावू लागले. त्यातच कुणा ग्रामजोश्याने लक्ष्मणाला रविवारचा उपवास करण्यास सांगून त्याची खंडोबाचरणी वाढलेली भक्ती अधिकच दृढ केली. खंडोबा हे पवार कुटुंबाचे कुलदैवत. ढोर मेहनत करणाऱया लक्ष्मणाने प्रपंचाला ऊर्जितावस्थेत आणल्यावरही स्वतःच्या वागण्यामध्ये जसा बदल केला नाही तशीच सोमवतीपर्वासाठी जेजुरीला जाऊन देवाला पहिली महापूजा बांधणे, रविवारचा उपवास करणे, खंडोबाची भक्ती करणे यात कुचराई केली नाही.

प्रपंचाचा गाडा सुरळीतपणे चालू असतानाच सर्वत्र भाऊसाहेब म्हणून परिचित झालेल्या लक्ष्मणाचा संपर्क त्या काळातील दिग्गज संतसत्पुरुषांशी येता झाला. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, काळबुवा, श्रीशंकर महाराज (धनकवडी), श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे, श्रीजोग महाराज, श्रीमाळीबाबा, श्रीकाणे महाराज (बेळगाव) यांचा सहवास घडला. अशातच वारकरी संप्रदायातील सत्पुरुष श्रीदेशमुख महाराज यांची भेट घडली आणि एक नवा शुभंकर योग लक्ष्मण ऊर्फ भाऊसाहेब पवार यांचे आयुष्य बदलून टाकता झाला.

सर परशुराम महाविद्यालयाच्या कपडे धुलाईचे काम करीत असता तेथील कुलकर्णी नावाच्या विद्यार्थ्याचे ‘काका’ भाऊसाहेब पवारांना ‘गुरू’ म्हणून लाभले. जन्मांध तरीही वेदाभ्यासी असलेल्या या कुलकर्णी महाराजांनी भाऊसाहेब पवारांना अनुग्रह दिला आणि समाधीवस्थेचा अनुभवही प्राप्त करविला. त्यांनी भाऊसाहेबांचे सुप्तावस्थेत असलेले ‘ज्ञानचक्षू’ जागृत केले. त्यांच्यातील मूळ परमेशतत्त्वाला गुरुउपदेशाचे प्रत्यक्ष निधान लाभले अन् लक्ष्मण पवार या सामान्य परिटाचे रूपांतर असामान्य परिटबाबांमध्ये झाले.

जेजुरीला श्रीशंकराचे साक्षात दर्शन घडणे, खंडोबाची जड झालेली पालखी केवळ हाताचा स्पर्श करून हलकी करणे या व अशा अगणित प्रसंगांमुळे ‘परिटबाबा’ त्यांची नवी ओळख प्रस्थापित करते झाले. येथून पुढे परिटबाबांनी त्यांचा अर्थार्जनाचा व्यवसाय कुटुंबीयांवर सोपविला आणि पुढील काळात ते सदोदित ईशसेवेत मग्न राहू लागले.

खेडवळ प्रापंचिकांना, विपरीत परिस्थितीच्या रेटय़ामुळे दबकून वागणाऱया भाबडय़ा संसारीजनांना ‘अनुभवाचे’ चार दैवी बोल सांगून रास्त मार्गदर्शन करणे, त्यांच्यातील श्रद्धा व भक्तिभाव जागृत करणे, अडचणीने गांजलेल्यांची गाऱहाणी ऐकून त्यांना परमार्थाचा ‘खरा’ मार्ग दाखविणे, गरजवंताला भंडाऱयाची पुडी देऊन त्यातून अतर्क्य व अगम्य ‘लीला’ करणे या व अशा अनेक प्रसंगांतून परिटबाबांनी त्यांचा आध्यात्मिक मार्ग निश्चित केला. ज्ञानेश्वर माऊलींच्या वचनांवर दृढ भाव ठेवत, सर्वसामान्य भाविकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील व त्यांच्या बुद्धीला पटतील अशी उदाहरणे देऊन परिटबाबांनी आश्वस्त केले. भरकटलेल्या मंडळींना मार्गस्थ केले. प्रसिद्धीला कस्पटासमान मानणाऱया परिटबाबांमुळे अनेक भाविक तरले, जगले आणि कृतार्थ झाले. 5 जुलै 1961 रोजी देहत्याग करेपर्यंतचे हे परिटबाबांचे अवतारकार्य वसंतराव गोखले आणि यशवंतराव शेंडे यांच्यामुळे जगासमोर आले.

कपडय़ांची धुलाई करता करता, मनाच्या मलिनतेलाही घासूनपुसून स्वच्छ करणारा हा अलौकिक ‘परिटबाबा’ पन्नासेक वर्षांपूर्वी आपल्यासोबत नांदत होता याची जाणीव पुण्यनगरी ‘पुणे’ आणि उर्वरित जगतालाही नव्हती ही खरी शोकांतिका आहे.

– [email protected]