हरवलेलं संगीत (भाग १४) : बनिया

>> शिरीष कणेकर

जयप्रकाश नारायण ‘जसलोक’मध्ये अ‍ॅडमिट होते तेव्हा त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून कल्याणजी-आनंदजी हॉस्पिटलच्या ‘फॉयर’मध्ये एक जथा घेऊन भजने आळवीत. जयप्रकाशजींच्या तब्येतीची ताजी खबर मिळवण्यासाठी आम्ही पत्रकारही तिथे पडलेलो असायचो. ओळख झाली, ओळख वाढली. बघता बघता मी ‘जसलोक’च्या समोरच असलेल्या कल्याणजींच्या ‘म्युझिक रूम’वरील गप्पांच्या फडात सामील झालो, पण चार भिंतीत गप्पा हाणण्यापेक्षा कल्याणजीला रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांपैकी एकीला टेकून किंवा बॉनेटवर बसून गप्पा हाणायला भारी आवडायचं. रात्रपाळी संपवत मी स्कूटरवरून घरी जात असताना पेडर रोडवर मला हमखास चकाट्या मारीत असलेला कल्याणजी दिसे. आपसूक माझी स्कूटर थांबे. ‘कोहिनूर’मधल्या मुक्रीच्या शब्दांत सांगायचं तर ‘तबलेवाले को तंबोरावाला मिल गया’ गप्पा मारण्यात मी तरबेज असल्याचं त्यानं ओळखलं. पुढे पुढे ट्रॅफिकवाल्याप्रमाणे तो पुढे होऊन माझी स्कूटर थांबवायला लागला. माझी नवी, पण हवीहवीशी वाटणारी रात्रपाळी सुरू व्हायची (जवळच समोर राहणारी लता मंगेशकर तेव्हा गाढ झोपेत असणार). माझी रात्रपाळी पहाटेपर्यंत का चालते हे माझ्या घरी कळायचंच नाही.

त्यानंतर कल्याणजीच्या रेकॉर्डिंगला जावं असं माझ्या मनात का आलं नाही कोण जाणे. आपला गप्पिष्ट गडी आघाडीचा संगीतकार आहे हेच मी विसरलो नव्हतो ना? त्याच्या बोलण्यात संगीत हा विषय क्वचितच असे. एकदा पहाटे चारच्या सुमारास त्यानं मला विचारलं, ‘‘अरे वो तुम्हाला दादा कोंडके तुफानी है क्या?’’

मला प्रश्नच कळला नाही. घड्याळाकडे पाहत मी स्कूटर सुरू केली. दादा कोंडकेकडे जावे असे माझ्या मनात फार आलं (ते जागेच असत), पण मी स्वत:ला आवरलं. म्हटलं, झोपायला नाही तरी ब्रेकफास्टला घरी जावं (स्वत:च्या). दादा निशाचर होते. त्यांना ‘विग’शिवाय कोणी पाहिलं असेल का?

एकदा कल्याणजीच्या ‘म्युझिक रूम’वर मी पायपुसण्यासारखा पडलेलो असताना तिथं दिलीप कुमार आला (बायका उगीचच पदर सावरतात तसा मी उगीचच सावरून बसलो. वास्तविक माझी कोणीही दखल घेतली नव्हती. दिलीप कुमारच्या लेखी तर जसं कोपऱ्यातलं टीपॉय तसा मी). दिलीप कुमारला त्याच्या आगामी चित्रपटातील गाण्याची चाल ऐकायची होती. कल्याणजीनं तत्परतेनं पेटी समोर ओढली व तिच्यावर बोटं फिरवीत त्यानं ‘सुनो मेरे बंधू रे’ टाइप आर्त सूर छेडले. दिलीप कुमारला ते फारसे रुचले नसावेत. कल्याणजीनं लगेच फोन फिरवून धाकटी पाती आनंदजी याला बोलावून घेतले. तो लगेच आला (तोपर्यंत दिलीप कुमार शेव-बटाटा पुरी खात होता). आनंदजीनं तबला बडवायला सुरुवात केली. कल्याणजीनं दुसरी चाल सादर केली. ती ‘डम डम डिगा डिगा’ धर्तीवर होती. दिलीप कुमार बहुधा शेव-बटाटा पुरीबरोबर कुठली चाल नीट जाईल याचा विचार करीत होता. मला कळेना की, ‘सुन मेरे बंधू’ला पर्यायी गाणं ‘डम डम डिगा डिगा’ कसं असू शकतं?

पण माझ्या लक्षात आलं की कल्याणजी हाडाचा बनिया होता. जाडा रवा नको, बारीक रवा घ्या, की भगर देऊ? काय म्हणाल ते, गिNहाईक हातचं जाता कामा नये. कल्याणजी व आनंदजी या दोन भावांत विनोद दुथडी भरून वाहत होता. संगीताचं खातं मात्र कल्याणजीकडेच असावं. त्याच्या पश्चात आनंदजीनं दुकानच बंद करून टाकलं.

कल्याणजीनं कारकीर्दीची सुरुवात छाछूगिरीनं केली. फिल्मवाल्यांना हीच भाषा कळत होती. निर्माता सुभाष देसाईनं (मनमोहनचा भाऊ) ‘सम्राट चंद्रगुप्त’चं संगीत कल्याणजीकडे सोपवलं. एक एक गाणं बनू लागलं तसा सुभाषचा धीर सुटत होता.

‘‘नौशाद जेवी धून नथी’’ तो कुरकुरायचा.

नौशाद जेवी धून नौशादच देणार, कल्याणजी कशी देणार? शेवटी कल्याणजीनं एक शक्कल लढवली. रस्त्यात पेटी वाजवून गाऊन भीक मागणारं एक जोडपं त्यानं गाठलं. रफी व लता यांना सांगितली नसेल इतक्या मनापासून कल्याणजीनं त्यांना ‘सम्राट चंद्रगुप्त’साठी बनवलेली ‘चाहे पास हो, चाहे दूर हो’ ही चाल समजावून दिली. त्यांच्याकडून ती घोटून घेतली. नंतर सुभाष देसाई राहायचा त्या खेतवाडीच्या नाक्यावर त्यांना पैसे देऊन गात उभं केलं.

एके दिवशी उत्साहानं फसफसत सुभाष देसाई कल्याणजीकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद थुईथुई नाचत होता.

‘‘कल्याणजी, जिंकलो आपण. तुमने कमाल कर दी’’ सुभाष देसाई धापा टाकीत म्हणाला.

‘‘काय झालं काय, सांगाल की नाही?’’ पेटीवरून बोटं फिरवीत कल्याणजीनं शांतपणे विचारलं.

‘‘काय झालं म्हणून काय विचारतोस? आपलं गाणं गल्लीबोळात लोकप्रिय झालंय. मी राहतो तिथल्या कोपऱ्यावरचा भिकारीदेखील म्हणत होता – ‘चाहे पास हो, चाहे दूर हो’’. कल्याणजीच्या चालीचा मुडदा पाडीत सुभाष देसाई बेसूर आवाजात गाऊ लागला.

जे गाणं अद्याप रेकॉर्डदेखील झालेलं नाही ते रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या कानापर्यंत जाऊच कसं शकतं ही साधी गोष्ट सुभाष देसाईच्या डोक्यात आली नाही. अर्थात त्याच्या डोक्याचं माप घेऊनच कल्याणजी ही यशस्वी चाल खेळला होता.

एकदा काही गाववाले त्यांच्याकडच्या लग्नाला अमिताभला घेऊन यावे यासाठी कल्याणजीला गळ घालत होते.

‘‘अगदी, अगदी. अमिताभ असतोच माझ्याबरोबर, पण एक बारीकशी अडचण आहे.’’

‘‘कसली?’’

‘‘काय आहे, शेवटी ही हीरो मंडळी आहेत. मागे एका लग्नात अमिताभने नवऱ्या मुलाला मंचावरून ढकलून दिलं व त्याच्या जागी उभा राहून ओरडला – ‘हूं दुल्हा छू!’’

बोलवायला आलेल्या मंडळीला घाम पुâटला. त्यांनी घाईघाईनं काढता पाय घेतला. कल्याणजीला बोलवायलाही ते विसरले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या