हरवलेलं संगीत (भाग 15) – ये है आशा…

1580

>> शिरीष कणेकर

आशा एकदा मला सांगत होती- ‘अहो, तुमची परवानगी न घेता मी माझ्या कार्यक्रमात तुमच्या ‘माझी फिल्लमबाजी’तला काही भाग सादर करते.’

‘काही हरकत नाही’ मी म्हणालो, ‘मी पण माझ्या एकपात्री कार्यक्रमात तुमची दोन-तीन गाणी म्हणतो. लोक म्हणतात मीच जास्त चांगला गातो. लोक म्हणतात बाबा!’

आशा हसत सुटली. आम्ही जास्त चांगले गातो म्हटल्यावर या बहिणींना एवढं हसू कसलं येतं कळत नाही.

एका सोहळय़ात मी माइकवरून म्हणालो, ‘कधी कधी वाटतं की, एक शिवाजीराजे भोसले आणि दुसरी आशा भोसले. बाकीचे नुसतेच बाबासाहेब भोसले!

श्रोत्यांत हास्यस्फोट झाला. शेजारी बसलेली आशा भोसले खुर्चीतून उसळली व खदखदून हसली. आपण एवढी उत्स्फूर्त, मनमोकळी दाद का द्यायची, असले नकारात्मक, तुसडे विचार तिच्या मनाला शिवलेदेखील नाहीत. जंटलमेन, दॅट इज आशा भोसले फॉर यू!

आशा भोसलेची जीभ तिखट आहे. (म्हणूनच ती मटण इतकी सुंदर करत असावी. मी खाल्लंय बाप्पा!) राजकुमार संतोषीच्या ‘अंदाज अपना अपना’मधील ‘ये रात और ये दूरी’ या गाण्याचं रेकॉर्डिंग चालल होतं. ओ. पी. नय्यरच्या संगीतावर राजरोस दरोडा घालून ढापलेली चाल आशाला समजून सांगताना नवोदित संगीतकार तुषार भाटिया म्हणाला, ‘आशाजी, ऐसा नही, ऐसा. मुझे ऐसा चाहिये’

एक दोन वेळा ऐकून घेतल्यावर आशा ताडकन म्हणाली – ‘ओ. पी.ची चाल कशी गायची हे तू मला शिकवतोस? मै तो सदियों से गाते आयी हूँ. तू तर तेव्हा जन्मलाही नसशील.’

तुषार भाटियाची बोलती बंद झाली.

एकदा मी आशाच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. कोण आलंय हे कळत नसल्यामुळे उषा मंगेशकर मागून दबकत दबकत आली.

अग ये उषा, ये’ आशा म्हणाली, ‘कणेकर आलेत. मंगेशकरांना त्यांच्यापासून काही भीती नाही.’

आशाचा जमालगोटा टोला मी हसत हसत झेलला. टोले देणे ही काही माझी मक्तेदारी नाही. आशासमोर तर नाहीच नाही. लग्नात घालायचा ‘शरारा’ विकत घेण्यासाठी ती माझ्या मुलीबरोबर निघाली होती. मी थोपवलं. ‘लग्नात नाचणार कोण आहे? मी नाचू?’ तिनं मला विचारलं. मी घाबरून नको नको म्हणालो. आता वाटतं की हो म्हणायला पाहिजे होतं. आमच्याकडच्या लग्नात आशा नाचली होती असं मी आयुष्यभर सांगत फिरलो असतो. अजूनही मी डोळय़ांपुढे चित्र आणायचा प्रयत्न करतो की आशा माझ्या मुलीच्या लग्नात ‘मेरा नाम चिन चिन चूँ’ किंवा ‘दैय्या रे दैय्या’ गात्येय व त्यावर नाचत्येय. हे भाग्य अंबानीच्या भाळीही नव्हतं. म्या पाप्यानं ते अव्हेरलं. मधुबाला तुमच्याकडे धुणीभांडी करेल म्हटल्यावर कोणीही नाहीच म्हणेल ना?…

आशाच्या संगीतजीवनात ओ. पी. नय्यरचा सिंहाचा वाटा आहे. ‘छम छमा छम’ (1952) ते ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (1973) या एकवीस वर्षांत ओ. पी.नं आशाला 162 ‘सोलो’ व 154 द्वंद्वगीतं दिली. ओ. पी.कडे आशा तुफान गायली. आपण ओ. पी.च्या प्रमुख गायिका आहोत. या अभिमानास्पद जाणिवेतून आलेला जबर आत्मविश्वास तिच्या गण्यातून दिसतो. ‘घबराइये न हमसे’ (‘दो दिल धडक रहे है’ – ‘इन्साफ’ – चित्रगुप्त) असं ती तलत मेहमूदला म्हणाली असली तरी सहगायकांनी खरोखरच वचकून रहावं असं तडाखेबंद गाणं ती ओ. पी.कडे गायली. ‘कुछ तो ऐसी बात कर जालिम’ (‘कैदी’), ‘छोटासा बालमा’ (रागिणी’), ‘आइये मेहेरबाँ’ (‘हावडा ब्रिज’), ‘रातों को चोरी चोरी’ (‘मुहोब्बत जिंदगी है’), ‘मै शायद तुम्हारे लिए’ (‘ये रात फिर न आयेगी’), ‘मेरी जान तुमपे सदके’ (‘सावन की घटा’), ‘ये है रेशमी’ (‘मेरे सनम’) व ‘चैन से हमको कभी’ (‘प्राण जाये पर वचन न जाये’)… ‘चैन से हमको कभी’ ही ओ. पी. व आशाची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणता येईल. पण मध्यंतरी त्यांचे संबंध विकोपाला गेले. इतके की ‘चैनसे हमको कभी’ला मिळालेले पारितोषिक घ्यायला आशा गेली नाही. ओ.पी. गेला. त्यानं समारंभात पारितोषिकही स्वीकारले पण परतताना वाटेत हाजी अलीला त्यानं ते पारितोषिक समुद्रात फेकून दिले. कुठे फेकलं ती जागाही मला ओ.पी. नं दाखवली. तिथं एखादं स्मारक व्हावं अशी त्याची इच्छा असावी. दोघांनीही एकमेकांवरचा सगळा राग त्या बिचाऱया गाण्यावर काढला. त्यातूनही ते गाणं जगलं व गाजलं.

आशाची ‘सोलो’ गाणी लतासारखी त्या प्रमाणात चटकन आठवत नाहीत. पण सर्वच संगीतकारांकडे तिची उत्तम गाणी आढळतात. पहा ः ‘दिल श्याम से डूबा जाता है’ (‘संस्कार’ – अनिल विश्वास), ‘दिल लगाकर हम ये समझे’ (‘जिंदगी और मौत’ – सी. रामचंद्र), ‘सबासे मे कहे दो’ (‘बँक मॅनेजर’ – मदन मोहन), ‘निगाहे मिलाने को’ (‘दिल ही तो है’ – रोशन), ‘तोरा मन बडा पापी’ (‘गंगा जमना’ – नौशाद), ‘पान खाये सैंय्या’ – ‘तीसरी कसम’ – शंकर -जयकिशन), ‘काली घटा छाये’ (‘सुजाता’ – एस. डी. बर्मन), ‘मेरा कुछ सामान’ (‘इजाजत’ – आर. डी. बर्मन), ‘ऐ गमे दिल’ (‘ठोकर’ – सरदार मलिक).

आशाचं मराठी संगीतातील कर्तृत्व अगाध आहे. तिथं तिनं काही करायचं बाकी ठेवलेलं नाही. भावगीत (‘रिमझिम पाऊस पडे सारखा’) चित्रपटगीत (‘मलमली तारुण्य माझे’), ‘बुगडी माझी सांडली ग’ (लावणी), नाटय़गीत (‘परवशता पाश दैवे’), बालगीत (‘नाच रे मोरा’), वग (‘सांगते ऐका’) भूपाळी (‘उठा उठा सकलजन’)…

माझ्यासमोर आशा स्वतःला ‘ऑलसो रॅन’ म्हणाली. मी राम जेठमलानींच्या तडफेनं तिचं म्हणणं खोडून काढलं. फार – फार तर ‘रनर्स अप’ म्हणा पण तेही नाही. मी देशात आणि परदेशात जिथं म्हणून गेलो, लोकांशी बोललो, मतांचा कानोसा घेतला त्यावरून मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की आशा लतापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. जे आहे ते आहे. ‘ऑलसो रॅन’ म्हणू नका हो. लता लता असेल तर आशा आशा आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या