‘भाई’गिरी

>> शिरीष कणेकर

त्या दिवशी भाई मेंगदे (अर्थातच नाव-आडनाव बदलले आहेत. नको ती शिंची कटकट… यांनी गुण उधळायचे आणि आम्ही यांचं नुसतं नावही घ्यायचं नाही. कोणाच्या कसल्या भावना दुखावतात देव जाणो. ते आचरटपणा करीत होते तेव्हा या भावना कुठे गेल्या असतात…?) तर उपसंपादक भाई मेंगदे तावातावानं तरातरा संपादकाच्या केबिनमध्ये घुसले व हातातली काठी त्यांच्या टेबलावर आपटत डरकाळी फोडून म्हणाले, ‘‘तू ट्रकखाली मरणार आहेस आणि मग मी संपादक होणार आहे. तुझी खुर्ची माझी आहे.’’

संपादकाची वाचा बसली. तो डोळे विस्फारून नुसता बघत बसला. हिरावली जाणारी खुर्ची मात्र त्यानं घट्ट धरून ठेवली. आता ट्रकसमोर न येण्याचं अवघड काम त्याला करायचं होतं.

भाई मेंगदेंची बत्तिशी नुसतीच शापवाणी नव्हती, तर भविष्यवाणी होती. मेंगदे स्वतःच्याच सांगण्यानुसार ख्यातनाम ज्योतिषी होते. ते फोनवरदेखील स्वतःची ‘होराभूषण’ अशी ओळख सांगत. कार्यालयातील काळं कुत्रही त्यांच्यावर विश्वास ठेवत नसे की त्यांना कुंडली दाखवत नसे. वर्तमानपत्रातली माणसं तशी एकूण अश्रद्धच.

जोशी घरून कोरडय़ा चपात्या व बाटलीत दूध घेऊन यायचा. कँटीनमधून तो केळं घ्यायचा व ते दुधात कुस्करून शिकरण करायचा. चपाती-शिकरण हे रोजचं जेवण. त्यात बदल नाही. ज्या एकाग्रतेनं तो केळं दुधात कुस्करायचा त्या एकाग्र चित्तानं तो कधी काम करताना दिसला नाही. महिला आघाडीवर मात्र त्यानं लक्षणीय यश संपादन केलं होतं. मी त्याला एकदा बोलतं करायचा प्रयत्न केला.

‘‘करायचं, बोलायचं नाही.’’ तो शिकरण करीत शांतपणे म्हणाला.

आम्ही फक्त शिकरण करू शकतो हे त्याला कोण सांगणार?

ऑफिसच्या पायऱयांवरून येताना लांबूनच मला ‘डेस्क’वर बसलेला मराठे दिसायचा. त्याचा चेहरा वेगवेगळय़ा ‘अदा’ नोंदवायचा. त्यावरून त्याच्या मनाचा ठाव घेणारं चित्रपटातील नवीन पाखरू ओळखण्याचं आव्हान तो मला द्यायचा. एकदा त्यानं ओठांच्या कोपऱयातून जीभ बाहेर काढत माझ्याकडे एक मारू कटाक्ष टाकला. माझ्या हृदयात ज्योत पेटली नाही. ‘‘जया भादुरी’’ तो विजयी स्वरात म्हणाला, ‘‘नयी है.’’

आज मराठे कुठे असेल? ऐश्वर्या, करीना, प्रियांका, परिणीता, विद्या, कतरिना, आलिया, श्रद्धा यांना पाहून तो कसे चेहरे करीत असेल? अजून तो उत्साह त्याच्यात शिल्लक असेल..?

भाई मेंगदेंची संपादकाविषयीची भविष्यवाणी सपशेल खोटी ठरली. संपादक ट्रकखाली तर नाहीच, पण नुसताही मेला नाही. मेंगदे आयुष्यात कधीही संपादक झाला नाही. यंव रे होराभूषण!

एकदा मेंगदेंचं व एका वरिष्ठ उपसंपादकाचं तुंबळ युद्ध झालं. होणारच. काम न करता चकाटय़ा पिटणाऱया मेंगदेंना तो वरिष्ठ उपसंपादक किती काळ सहन करणार? तो मेंगदेंना वरच्या पट्टीत काहीतरी बोलला. झा।़।़लं. होराभूषणशी या पट्टीत बोलायचं? दोघांची जुंपली. तलवारी बाहेर पडल्या, गदा फिरू लागल्या, वाघनखं निघाली, दांडपट्टे परजले गेले. आम्ही गंमत पाहत उभे होते. दोघांपैकी कोणाचं मस्तक धडावेगळं होतंय यावर आमच्या पैजा लागत होत्या. शब्दशर बंदुकीच्या गोळीसारखे सुटत होते. दोघांचेही आवाज टिपेला गेले होते. याक्षणी मेंगदेंनी ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. आवाज जराही खाली न आणता मेंगदे ओरडले, ‘‘थांबा! टॉयलेटला जाऊन येतो.’’

सगळंच थांबलं. आमचा हिरमोड झाला. एका युद्धखोराच्या मूत्रविसर्जनाच्या तीक्र इच्छेपायी युद्धविराम झाल्याचे दुसरे उदाहरण असल्यास मला माहीत नाही. शस्त्र्ासंधीसाठी हा उपाय नामी वाटतो. भाई मेंगदेंनी जगाला दिलेली ही देणगी आहे.

मेंगदे पितापुत्र अकोल्याचे. ते मुंबईला स्थलांतरित झाले. सामान मागून ट्रकनं आलं. दोघांनीही सामान उतरवून घेण्यास नकार दिला. ट्रक ड्रायव्हर म्हणाला की, हे आमचं काम नाही. बराच वेळ हुज्जत झाली. अखेर वैतागून ड्रायव्हरनं क्लीनरच्या मदतीनं सामान अंगणात उतरवलं. मात्र ते आत नेण्यास सपशेल नकार दिला. जरुरीपुरती स्वयंपाकाची भांडी बापलेकांनी आत नेली. बाकीचं सगळं सामान बाहेरच अंगणात पडू दिलं. काही चोरांनी नेलं, काहींचा पावसानं विध्वंस केला. हळूहळू अंगण साफ झालं. मेंगदे द्वयीनं त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.

मला नेहमी एक प्रश्न पडायचा की, मेंगदे, जोशी, मराठे आणि मंडळी एवढय़ा उचापती करायचे, तर ते पेपर कधी व कसा काढायचे?

भाई मेंगदे एकदा रंगभवनला एका कार्यक्रमाला गेले. तिथे त्यांची एका कुटुंबाशी ओळख झाली. कार्यक्रम लांबला. शेवटची ट्रेन हुकली. वेळ काढायला मेंगदे त्या कुटुंबाला ऑफिसात घेऊन आले. मग आडव्या झालेल्या एकेका द्रोणाचार्य-कृपाचार्यांशी ओळख करून देत मेंगदे म्हणाले, ‘‘तो चड्डीवर उघडा झोपलाय तो चित्रपट समीक्षक, तो बुटासकट झोपलाय तो अर्थकारण बघतो…’’ एकापाठोपाठ एक बुरूज ढासळत होते. वृत्तपत्र झपाटय़ानं त्यांच्या मनातून उतरत होतं.

दुसऱया दिवशीपासून त्या कुटुंबानं वेगळा पेपर लावला असावा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या