टिवल्या-बावल्या : तीन कुत्रे

>> शिरीष कणेकर

तीन कुत्रे रहदारीचा हमरस्ता ओलांडत होते.

‘‘आपण आपल्या युवा मालकांप्रमाणे तरुणीच्या कमरेला विळखा घालून थिरकत थिरकत रस्ता क्रॉस करू या का?’’

‘‘नको-नको’’ बाकीचे दोन कुत्रे एका सुरात म्हणाले.

‘‘का नको?’’ पहिल्या कुत्र्यानं विचारलं.

‘‘ते रिस्की आहे. दुसरा म्हणाला, ‘‘ट्रॅफिकमध्ये या मर्कटलीला महागात पडू शकतात. रोड अॅक्सिडेंटविषयी रोज पेपरात येतं असं माझा मालकच बोलत होता.’’

‘‘मग रस्त्यावरून चालताना तो आपल्या सवयी का बदलत नाही?’ पहिल्यानं विचारलं.

‘‘सर्वसामान्य माणसांसाठी असलेले नियम आपल्याला लागू होत नाही असा त्याचा ठाम विश्वास आहे.’’ दुसरा म्हणाला.

‘‘मी जोर लावून साखळी खेचत त्याला रस्त्याच्या कडेला घेऊन जायचा सतत प्रयत्न करतो. पण बरोबर त्याची ‘आयटेम’ असेल तर तो मला घेऊनच जात नाही.’’ तिसरा कुत्रा म्हणाला.

‘‘तू कुठे त्यांच्या मध्ये येतोस?’’ पहिल्यानं विचारलं.

‘‘त्या ‘आयटेम’ला तसं वाटतं. तिला त्याचं ‘अन्डिव्हायडेड अटेंशन’ म्हणे हवं असतं रस्ता क्रॉस करताना?’’

‘‘कठीण आहे बाबा या द्विपाद प्राण्यांचं’’ दुसरा म्हणाला. ‘‘परवा माझ्याबरोबर सोमणांची पिंकी होती. तुम्हाला माहीतच आहे की, सध्या आमचं इलूइलू चाललंय. आम्ही रस्ता क्रॉस करीत होतो तेव्हा पिंकीची टकळी सतत चालू होती. सोमणीणबाई नवऱयाला तोंडावर टकल्या कशी म्हणाली हे सांगण्याची ही काय वेळ होती की जागा? लग्नाची बायको असती तर तिला तिथंच खडसावलं असतं, पण काय करणार, माझे हात दगडाखाली होते. दस्तुरांचा बोस्की फांदा मारायला टपूनच बसला होता. माझ्या डोळय़ांदेखत त्यानं पिंकीला पटवून नेली असती. शेवटी मी आयडिया केली.’’ सोमणबाईंची आणखी एक गंमत सांगू का?’’ असं बोलत बोलत मी तिला रस्त्याच्या मध्यावरून बाजूला नेलं. कोणा कोणा बाईंचे किस्से सांगण्याच्या बहाण्यानं मी तिला आडबाजूला एखाद्या लॉजमध्ये सहज घेऊन जाऊ शकलो असतो, पण संस्कार आड येतात ना. मी म्हणजे बोस्की नव्हे.’’

‘‘आपल्या तरुण, श्रीमंत व ‘डॅशिंग’ मालकांवर संस्कार नाहीत असं तुला म्हणायचंय का?’’ पहिला म्हणाला.

‘‘मी कोण म्हणणार? शेवटी मी म्हणजे आपण सगळेच पाळीव प्राणी आहोत. आपण आपल्या मर्यादेत राहायला हवं. मालकांना जोखणं हे आपलं काम नाही. तरीही एक गोष्ट सांगावीशी वाटते. हे ऐश्वर्यात लोळतायत आणि आपल्याला मात्र मऊ, चेमट व वास येणारी शिळी बिस्किटे देतात. बस्स, यापुढे तोंडाला कुलूप.’’ तिसरा म्हणाला.

‘‘माझा मालक शाकाहारी आहे.’’ पहिला कुत्रा तोंडातल्या तोंडात गुरगुरल्यासारखा हसत म्हणाला, ‘‘तो मला करपलेली दुधीची भाजी व कच्ची चपाती देतो. कुत्र्यांना काही चालतं अशी त्याची समजूत आहे. आपल्याला तरी काय चॉईस आहे? त्याची गर्लफ्रेंड येते तेव्हा तिच्यासाठी तो पिझ्झा व पास्ता मागवतो. ती आल्यावर तो मला खोलीतून बाहेर का काढतो कळत नाही. जो बापाला घाबरत नाही तो मला थोडाच घाबरत असेल? मला आठवतंय की एकदा ओरडणाऱ्या बापाला तो ‘भुंकू नका’ असं म्हणाला होता. आपण आपल्या वडिलांशी या भाषेत कधी बोलल्याचं आठवतंय का?’’

‘‘या लोकांना देव बुद्धी देत नाही का?’’ तिसऱ्या कुत्र्यानं विमनस्कपणे विचारले.

‘‘कुबुद्धी देतो.’’ दुसरा कुत्रा म्हणाला. ‘‘त्यांच्या वागण्यावरून वाटतं की हा त्यांचा शेवटचा मनुष्यजन्म असावा. त्यांना याची जाणीव नसावी आणि असली तरी पर्वा नसावी. मस्ती माणसाकडून हे सगळे खेळ करवून घेते.’’

‘‘आपण मनुष्य प्राण्यांविषयी इतकं का बोलतोय?’’ पहिला कुत्रा म्हणाला, ‘‘ते बोलतात का आपल्याविषयी इतकं समरसून? आपल्याला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान असतं, ‘लेट अस फेस द रिऍलिटी…’
तिसऱ्या कुत्र्यानं सहमत होऊन मान डोलावली. दुसरा कुत्रा मान वेळावून पिंकी कुठं दिसतेय का बघत होता.

तेवढय़ात भरधाव वेगाने येणाऱया इंपोर्टेड गाडीनं तिन्ही कुत्र्यांना चाकांखाली चिरडून मारले. श्वानवधाचा गुन्हा मनुष्यवधाप्रमाणे गंभीर समजला जात नाही हे गाडीचा मालक-चालक जाणून होता. दिवंगत कुत्र्यांची वकिली करायला कोणी पुढे येणार नव्हता. मऊ, चेमट, वास येणारी शिळी बिस्किटे, करपलेली दुधीची भाजी व कच्ची चपाती यांचं आता काय करायचं एवढाच प्रश्न कुत्र्यांच्या मालकांना पडणार होता. ‘कुत्ते कुत्ते की मौत मरे’ असा विनोद सुचून गाडीवाला स्वतःशीच हसला. भपकन् दारूचा भपकारा आला…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या