रान फुलांच्या सौंदर्याने कोकणातील कातळ बहरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाचा जोर ओसरून ऊन पडू लागताच हिरवेगार असणारे कातळ श्रावणात विविध रानफुलांनी बहरून जातात. विविध आकाराच्या रंगीत रानफुलांनी कातळाचा परिसर बहरला आहे. श्रावण महिन्यात सुरु होणारा रानफुलांचा हंगाम आश्विन महिन्यापर्यंत असतो. या तीन महिन्यात विविधरंगी फुलांनी निसर्ग बहरतो. त्यात रानफुलांचे सौंदर्य सर्वांनाच आकर्षित करते.

flower1

श्रावणात सुरु असणारा ऊनपावसाचा खेळ, त्यामुळे पडणारे इंद्रधनुष्य, डोंगर रांगामधून दाटून येणारे दाट धुके असे आल्दाददायक वातावरण असते. त्यातच रानफुलांच्या सौंदर्यांची भर पडते. निसर्गाच्या मुक्त उधळणीमध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागातील कातळांचा परिसर विविधरंगी फुलांनी फुलला आहे. एरवी कोरडा असणारा कातळाचा परिसर सध्या आकर्षक फुलांनी सजल्याने खुलून दिसत आहे. कातळावरील परिसरामध्ये सहा-सात इंच उंचीच्या रोपट्यांवर फुललेल्या रानफुलांनी खुललेले निसर्गसौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची पावले वळथ आहेत.

श्रावणात कोकणातील निसर्गसौंदर्य बहरले आहे. ठिकठिकाणी कोसळणारे धबधबे आणि त्याच्या जोडीने निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल नजरेचे पारणे फेडते. गेल्या काही दिवसांपासून कातळ परिसर रंगीबेरंगी रानफुलांनी सजला आहे. अशाच प्रकारची सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपट्यांना निळाशार रंगाच्या फुलांसह अन्य फुले आली आहेत. श्रावणात या फुलांना बहर आला असून निळ्या-जांभळ्या-पांढऱ्या रंगाच्या या फुलांचे सौंदर्यही पर्टकांना आकर्षित करत आहे.

श्रावणातील इंद्रधनुष्य आणि विविध रंगांची फुले माळरानांच्या सौंदर्यात भर घालत आहे. कोकणच्या माळरानांवर फुलणारी रानफुले म्हणजे, निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांना एक पर्वणीच असते. कोकणच्या माळरानावर सध्या सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी, सोनवेल, कर्टूल, सोनतळ, शेरवड, कुडा, कोरंटी, गायरी, गोवीळ, गांधारी, कोंडानी, भेंद्री, हळूदा, तेरडा, दूधवेल, नावळी, हरणतोंडी, कळलावी, रानहळद, कवळा, घाणेरी, रानमोडी, कोसमोस, कारवी, डिकेमाळी, टोपली, सोनकी, गवळण, कुमुदिनी, गंधारी, अग्निशिखा यासह अनेक प्रकारची रानफुले बहरलेली पाहायला मिळत आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही फुले आकर्षण ठरत आहेत.