
>> अंजली महाजन
डॉ. सीमा राव हे नाव कदाचीत सर्वसामान्यांना फारसे परिचित नाही पण, लष्करातील हजारो जवानांना मात्र हे नाव चांगलेच परिचित आहे. डॉ. सीमा राव या देशातील पहिल्या आणि एकमेव महिला कमांडो ट्रेनर आहेत. ज्या कमांडोंना प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी तब्बल 20 हजार कमांडोंना प्रशिक्षण दिले आहे. त्या जगभरातील 10 महिलांपैकी एक आहेत ज्यांनी ’जीत कुने दो’ हा मार्शल आर्टमधील अत्यंत अवघड प्रकार आत्मसात केला आहे.
महिलावर्गासाठी आता कोणतेच क्षेत्र अपवाद राहिलेले नाही. अंतराळ असो की बँकिंग क्षेत्र असो महिलांनी आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे. आता तर हवाई दलातही पायलट म्हणून महिला रुजू झाल्या असून सीमेवरच्या गस्त पथकातही महिलांचा समावेश केला आहे. अशाच काही कर्तृत्वान महिलांमध्ये सीमा राव या मुंबईच्या महिलेचा विशेष उल्लेख करावा लागेल. हिंदुस्थानातील कमांडोंना प्रशिक्षण देणाऱया त्या पहिल्या महिला प्रशिक्षक आहेत. आतापर्यंत 20 हजारांहून अधिक कमांडोंना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरलेल्या सीमा राव यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात वर्ल्ड पीस काँग्रेस, मलेशिया यांच्याकडून दिला जाणारा जागतिक शांतता पुरस्कार, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा स्वयंसेवक सेवा पुरस्कारांचा समावेश आहे. परंतु त्यांच्या मते सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे कामातून मिळणारे समाधान होय! हिंदुस्थानी लष्करातील जवानांना प्रशिक्षण देऊन राष्ट्रकर्तव्य चोखपणे बजावत आहेत. यातच त्यांना मोठे समाधान वाटते.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सीमा राव यांच्याकडे एमबीएची पदवीदेखील आहे, परंतु त्यांचे स्वप्न वेगळे होते. याच स्वप्नामुळे आज त्या उच्च स्थानावर पोचल्या आहेत. आपल्या वाटचालीत सीमा यांना कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे, मात्र त्यापुढे न डगमगता त्यांनी आपल्या स्वप्नाकडे कूच केली. सीमा मिल्ट्री मार्शल आर्टस्मध्ये 7 डिग्री ब्लॅक बेल्ट होल्डर आहेत. अशा प्रकारचा किताब मिळवणाऱया त्या एकमेव हिंदुस्थानी महिल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो कमांडोंना प्रशिक्षण दिले आहे, तेही मोफत! याशिवाय सीमा कॉम्बॅट शूटिंग इन्स्ट्रक्टर, फायर फायटर, स्कूबा डायव्हर आणि गिर्यारोहकही आहेत. वडील स्वातंत्र्यसैनिक असल्याने त्यांना देशासाठी काहीतरी करायला पाहिजे, असे सतत वाटत असे. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांची मेजर दीपक राव यांच्याशी गाठ पडली आणि तेच पुढे त्यांचे पती झाले. या युवकानेच सीमाला कमांडो प्रशिक्षक होण्यासाठी प्रेरित केले. अर्थात सीमा यांच्या आईवडिलांना हे संबंध मान्य नव्हते. तरीही त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. या युवकाने सीमाला मार्शल आर्टस्चे कौशल्य शिकवले. एखाद्याला प्रशिक्षित करण्याअगोदर स्वतःचे संरक्षण करण्याचे धडे गिरवणे गरजेचे असते. त्यातून मार्शल आर्टस्चे प्रशिक्षण घेतले. दिवस-रात्र एक करून हे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानुसार त्या कमांडो प्रशिक्षक होण्यासाठी आता सज्ज झाल्या होत्या. त्या आपल्या ध्येयाजवळ पोचलेल्या होत्या. एकदा सकाळी पुण्यात लष्कराच्या एका गटाला ते दोघेही जाऊन भेटले आणि त्यांना मार्शल आर्टस्ची कला सादर करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार त्या लष्करी अधिकऱयांनी परवानगी दिली. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
जसजसे ट्रेनिंगचे काम वाढू लागले तसतसे सासू-सासऱयांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यांना मी एखाद्या सुनेप्रमाणे काम करावे अशी इच्छा असल्याने ती इच्छा मी पूर्ण करू शकले नाही. आम्हाला त्यांनी घर सोडायला सांगितले. काही काळ आम्हाला एका छोटय़ा क्लिनिकमध्ये राहावे लागले. तेथे मी दररोज रुग्णांना तपासत असायचे. याशिवाय आम्हाला राहण्यासाठी दुसरी जागा पण नव्हती. गरज भागविण्यासाठी मला अंगावरचे दागिनेही विकावे लागले. याबाबत मला आजही खंत वाटत नाही. मी माझे तरुण वय डोंगरात, वाळवंटात आणि प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ जवानांच्या प्रशिक्षण केंद्रात घालवले आहे आणि मी प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. गेल्या वीस वर्षांत आतापर्यंत त्यांनी 20 हजार कमांडोंना मार्शल आर्टस्चे ट्रेनिंग दिले आहे. त्यात एनएसजी, ब्लॅककॅट्, आयएएफ गार्डस्, इंडियन नेव्ही मार्कोस, बीएसएफ यासारख्या असंख्य क्षेत्रात काम करणाऱया कमांडोंना ट्रेनिंग दिले आहे. 26 /11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमा राव यांना 16 शहरातील पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. जेव्हा आमच्यावर कुटुंब वाढवायची वेळ आली तेव्हा मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तडजोड करण्याची गरज भासली नाही. मी करीयरच्या अगदी उच्च स्थानावर होते आणि मला ते काम थांबवायचे नव्हते. त्यामुळे आम्ही मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. आज माझी मुलगी डॉक्टर आहे. प्रत्येक दिवस अभिमानास्पद जाईल, असे ती काम करत असल्याचे सीमा राव सांगतात.
लोक नेहमीच असे म्हणतात की, आपला समाज पुरुषप्रधान आहे. परंतु मी एक महिला असूनही माझे स्वप्न साकार करताना कधीही आणि कोणतीच अडचण समोर आली नाही. आमचे संबंध बरोबरीचे आहेत आणि मजबूत आहेत. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकमेकाला सारखेच योगदान दिले आहे. एखादा समाज तेव्हाच पुढे जातो जेव्हा पुरुष आणि महिला दोघेही स्वयंपूर्ण असतील आणि दोघांना सारखाच सन्मान मिळेल, असे सीमा राव म्हणतात.
























































