पारनेर तालुक्यातील सुपे महसूल मंडळातील काही गांवे वगळता इतरत्र पावसाने दोन दिवस उघडीप दिल्याने खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या तीन-चार वर्षांत यावर्षी प्रथमच जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱयांमध्ये उत्साह आहे. मात्र, विविध बियाणे, खतांच्या किमतीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याने पेरणीच्या खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱयांची तारांबळ उडाली आहे.
गेल्या वर्षी साडेतीन ते चार हजार रुपयांना मिळणारी वाटाणा बियाण्याची 40 किलो गोणीची किंमत यावर्षी साडेसात हजार रुपये झाली आहे. हिरव्या वाटाण्याला मिळणाऱया दरापेक्षा बियाण्याचा दर जवळपास चौपट आहे. साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल विकल्या जाणाऱया सोयाबीनच्या बियाण्याचे दर प्रतिक्विंटल साडेसात ते आठ हजार रुपये आहेत. बियाण्यावर केली जाणारी प्रक्रिया, मजुरी व कंपनी, व्यापाऱयांचा नफा या बाबी गृहीत धरल्या तरी बियाण्याचा दर जास्त असल्याचे वाटाणा उत्पादकांचे म्हणणे आहे.
बाजरी, मूग, मका, उडीद या खरीप हंगामात घेतल्या जाणाऱया पिकांच्या बियाण्यांच्या किमतीत गेल्यावर्षीच्या तुलनेत सर्वसाधारणपणे 20 टक्के वाढ झाली असल्याचे बियाणे व खते विक्रेते अशोक डमरे यांनी सांगितले. वाटाण्याचे बियाणे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातून येते. तेथे वाटाण्याच्या हंगामात गारपीट झाल्याने वाटाण्याचे उत्पादन कमी झाले. तसेच जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तेथील स्थानिक बाजारपेठेत हिरव्या वाटण्याच्या शेंगांना उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे बियाण्यासाठी पीक राखून ठेवण्याऐवजी हिरव्या शेंगा विकणे शेतकऱयांनी पसंत केले. परिणामी बियाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे वाटाण्याच्या बियाण्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याचे डमरे यांनी सांगितले.
बियाणे उत्पादक कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे कंपन्या व विक्रेत्यांकडून शेतकऱयांची लूटमार होते. दुसरीकडे शेतमालाला हमीभाव न देता ग्राहकांना झळ बसू नये, म्हणून सरकार शेतमालाचे भाव नियंत्रित राहण्यासाठी विविध उपाययोजना करते. ही बाब शेतकऱयांना कर्जाच्या खाईत लोटणारी आहे.
– महेंद्र पांढरकर, प्रगतिशील शेतकरी, निघोज.
सोयाबीन बियाण्यासाठी अनुदान
n कृषी विभागाकडून सोयाबीन बियाण्यासाठी प्रतिकिलो 25 रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणे 85 रुपयांऐवजी 65 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करता येईल. शेतकऱयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून परवाना (परमीट) घेऊन महाबिजच्या अधिकृत विक्रेत्यांकडून अनुदानित सोयाबीन बियाणे खरेदी करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मारुती घुले यांनी केले आहे.
पीकनिहाय प्रस्तावित क्षेत्र
पीक गेल्या वर्षीचे यंदाचे
क्षेत्र हेक्टर क्षेत्र हेक्टर
बाजरी 17 हजार 709 18हजार 594
मूग 16 हजार 099 18 हजार 022
सोयाबिन 12 हजार 507 13 हजार 132
वाटाणा 6 हजार 516 6 हजार 842
मका 2 हजार 184 2 हजार 293
तूर 2 हजार 170 2 हजार 278
कांदा 930 1 हजार 531
ऊस 516 542
उडीद 258 270
भुईमूग 33 35
एकूण 58 हजार 082 63 हजार 539