
शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून पदोन्नती, अनुकंपा भरतीसह इतर रखडलेले प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, विभागप्रमुख- आमदार विलास पोतनीस यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड आणि मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांची भेट घेतली. पदोन्नतीस पात्र असूनही त्यापासून अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तातडीने पदोन्नती देण्यात यावी, तसेच ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही अशा कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत संबंधित पदाची वेतनश्रेणी देण्यात येते. परंतु मंडळातील कर्मचारी अद्याप या योजनेपासून वंचित असून यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी पोतनीस यांनी केली. त्यावर पदोन्नती समितीची बैठक 30 ऑक्टोबरपूर्वी घेऊन सर्व कर्मचाऱयांना पदोन्नतीचा लाभ दिला जाईल तसेच पदोन्नती समितीच्या बैठकीनंतर पुढील आठ दिवसांत आश्वासित प्रगती योजनेच्या समितीची बैठक घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाईल, असे आश्वासन मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड आणि सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्याकडून देण्यात आले.
अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित नियुक्त्या, मूळ आस्थापनेवरील मंजूर रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात यावीत, लेखा आणि आस्थापना विभागामध्ये अद्ययावत संगणक प्रणाली कार्यान्वित करावी, अशा मागण्यांवरही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. संघटनेचे सरचिटणीस संजय नार्वेकर, उपाध्यक्ष उदय मयेकर, रमेश तावडे, चिटणीस विजय म्हात्रे, प्रभारी प्रशासकीय अधिकारी प्रमोद नांदगावकरदेखील या बैठकीला उपस्थित होते.































































