दिलीप कुमार यांना धमकी देणाऱ्या भोजवानीविरोधात पालिकेकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानू यांना धमक्या देणारा बांधकाम विकासक समीर भोजवानी याच्याविरोधात आता वांद्रय़ातील अप्सरा हाऊसिंग सोसायटीने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली आहे. अप्सरा सोसायटीची इमारत बांधताना भोजवानी याने एफएसआय आणि अग्निसुरक्षाविषयक नियम धाब्यावर बसवल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

दिलीप कुमार यांच्या पाली हिल येथील बंगल्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न भोजवानी करत असल्याची तक्रार या आधी सायरा बानू यांनी केली होती. याच बंगल्याला खेटून उभ्या असलेल्या अप्सरा सोसायटीने भोजवानीच्या विरोधात पालिकेकडे तक्रार केली आहे. अप्सरा सोसायटीचे रहिवाशी निरंजन शेट्टी यांनी अजोय मेहतांना भेटून इमारतीतील अनियमिततेबाबत तक्रार केली. तक्रारींची काही वर्षांपूर्वी सहकार विभागाच्या उपनिबंधकांमार्फत चौकशी केली होती. अप्सराप्रमाणेच भोजवानीने बांधलेल्या वांद्रय़ातील पाच सोसायटय़ांच्या बांधकामात अनियमितता असल्याचे शेट्टींचे म्हणणे आहे.