राज्यभरात आचारसंहिता भंगाच्या एक हजार 862 तक्रारी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election-logo-code-of-conduct

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यभरात आचारसंहिता भंगाच्या एक हजार 862 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या तक्रारींबाबत जिल्हास्तरावर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तक्रारींमध्ये मतदारांना आमिष म्हणून सोने, दारू, अमली पदार्थांचाही वापर झाल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. या तक्रारींनुसार दारू, सोने, अमली पदार्थ आणि रोख रक्कम मिळून 75.79 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निवडणुकीमध्ये मतदारांना निर्भय व मुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याअंतर्गत पोलीस, आयकर, अबकारी विभाग इत्यादी विभागांमार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. या विभागांनी आतापर्यंत 19.82 कोटी रुपये इतकी रोख रक्कम, 38.36 कोटी रुपये इतक्या किमतीचे सोने व इतर जवाहिर, 13.64 कोटी रुपये इतक्या किमतीची दारू, 3.96 कोटी रुपये इतक्या किमतीचे मादक पदार्थ याप्रमाणे एकूण 75.79 कोटी रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी दिली.