
>> नमिता वारणकर
कोरोना व्हायरस हा सध्या जगभरातील चर्चेचा विषय… या व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे सर्वांनाच सक्तीची सुट्टी जाहीर झाली आहे… सुट्टीचं कारण त्रासदायक असलं तरीही या निवांत वेळेचा उपयोग आपले कलाकार कसा करतील, हे त्यांच्याच शब्दांत.
वाचनासाठी वेळ देईन
सक्तीच्या सुट्टीच्या दिवसांत स्वतःची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे ते पार पाडायलाच हवं. ते करताना नाण्याची दुसरी बाजू अशी बघायची की, छान सुट्टी मिळाली आहे तर मी निश्चितच वाचेन. कारण मधल्या काळात प्रयोग आणि चित्रीकरणामुळे वाचन राहिलं होतं त्यामुळे वाचण्यावर भर देईन. माझी जुनी गाणी ऐकायची राहिली होती. सकाळी शूटिंगला निघताना किंवा गाडीत जो काही वेळ मिळायचा त्यावेळी फक्त रे]िड़यो ऐकायचे. पण आता मला हवी ती जुनी हिंदी गाणी घरी बसून ऐकता येतील. सतत नाटकाचे प्रयोगच करत होते. त्यामुळे फक्त नाटक-नाटक एवढंच विश्व होतं. त्यामुळे आता वेगळ्या विषयावरही मी मंगेशसोबत बोलू शकेन. कारण तेही घरी असतील. आम्ही दोघेही एकत्र घरी असणार आहोत. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. या सगळ्याच्या मागे निश्चितच मी माझं नाटक मिस करतेय. कारण प्रयोग होत नाहीएत याचं मला फार वाईट वाटतंय किंवा मुलांच्या परीक्षांचा काळ आहे. वर्षभर अभ्यास करूनही परीक्षा त्यांना देता येणार नाही. तसेच आम्ही घरात बसलोय म्हणून फक्त आमचाच विचार करतोय, पण ज्यांना कार्यालयात जावंच लागणार आहे. त्यांनीही त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
– लीना भागवत, अभिनेत्री
भरपूर रियाज करणार
कोरोना व्हायरसमुळे सक्तीची सुट्टी मिळाली आहे. यामुळे मला तर खूप दिवसांनंतर रियाज करायला वेळ मिळणार आहे. त्यामुळे मी भरपूर रियाज करणार आहे, गाण्यात वेळ घालवणार आहे. कारण इतर वेळी मला अजिबात वेळ मिळत नाही.
– राहुल देशपांडे, गायक
घरी राहून प्रयत्न करणार
आम्हा खेळाडूंसाठी जास्त महत्त्वाचं जिमला जाणं असतं. या जोडीला आमचं आऊटडोअर प्रशिक्षण सुरू असतं, मात्र कोरोना व्हायरसमुळे जिम बंद आहे. घराबाहेर खेळाच्या प्रशिक्षणासाठी जाऊ शकत नाही. याकरिता घरी राहून जेवढं शक्य आहे तेवढं व्यायाम, मेडिटेशन करण्यावर भर देणार आहे. यामुळे फिटनेस मेंटेन राहण्यास मदत होईल. सर्वांना हेच सांगेन की, हे 15 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी जेणेकरून घरी राहावं.
– रिशांक देवाडीगा, कबड्डीपटू
सुट्टय़ांमुळे कोरोनाला आळा
शिखापूरला माझी शेती आहे. शेतात सध्या गहू काढायचे काम सुरू आहे. तुरीची डाळ भरडून आणणे, भिजवणे, वाळवणे, डाळ गिरणीत उसाची, शेवग्याची लागवड करणे अशी सर्व कामे मला करून घ्यायची आहेत. ही सर्व कामे यंदाच्या सुट्टीच्या काळात मी करून घेणार आहे. एका झाडाखाली बसून शेतात काम करणाऱयांकडे लक्ष द्यायचं तसेच काही कागदपत्रांची कामं असली तर आता मिळालेल्या रिकाम्या वेळात करून घ्यायची. कोरोनामुळे सक्तीची सुट्टी मिळाली खरी, मात्र मला इतर कलाकारांचं ही वाईट वाटतंय. महिन्याला 10 ते 15 कार्यक्रम होतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, पण आता सगळं एकदमच बंद झालं. लोकं कार्यक्रम कधी होणार आहात, अशी चौकशी करतात. तरीही प्रशासनाचा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं. सुट्टय़ांमुळे कोरोना व्हायरसला आळा बसू शकेल.
– सुरेखा पुणेकर, लावणी कलावंत