
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा 83 वा जन्मदिन आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव 17 ते 19 मे या कालावधीत फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या महोत्सवात 1 कोटी रामनाम जप, धर्मगुरूंच्या उपस्थितीत सनातन राष्ट्र उद्घोष संत सभा, सनातनी संस्कृतीला पुनर्वैभव मिळावे यासाठी मान्यवरांचे भाषण, हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री पुरस्कार सोहळा, विश्वकल्याणासाठी महाधन्वंतरी महायज्ञ असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
देशासमोर उभी असलेली आव्हाने पाहिली तर सनातन धर्मियांचे अस्तित्व टिकवणे आणि सनातन धर्माचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे; म्हणूनच हा महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज, महंत रवींद्र पुरी महाराज, योगऋषी बाबा रामदेव, जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी राजराजेश्वर माऊली सरकार, महंत राजू दास, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद महाराज, देवकीनंदन ठाकुरजी महाराज यांच्यासह पेंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहतील.