समर्थक आमदारांचा आकडा गुलदस्त्यात; अजित पवार यांना नक्की किती आमदारांचा पाठिंबा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 आमदारांचा पाठिंबा आहे असा दावा  राष्ट्रवादीचे नेते आज करीत होते. पण वांद्रे येथील बैठकीला नक्की किती आमदार उपस्थित होते याचा अधिकृत आकडा अखेरपर्यंत जाहीर करण्यात आला नाही.

वांद्रे येथील एमआयटीमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 40 आमदारांनी समर्थनाच्या सह्या दिल्याचा दावा केला.  शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांची नावे उपस्थितांच्या यादीत सांगण्यात आली, पण समर्थक एकाही आमदाराचे नाव उघडपणे घेण्यात आले नाही. मात्र राष्ट्रवादीच्या एका नेत्याने मेळाव्याला 37 आमदार उपस्थित असल्याचे खासगीत सांगितले. पत्रकारांनी उपस्थित आमदारांच्या नावाची यादी मागितली, पण नावाची यादी हा नेता सादर करू शकला नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नक्की किती आमदार उपस्थित आहेत याचा अधिकृत आकडा अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिला.

पाच हजार प्रतिज्ञापत्र

वांद्रे येथील मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर आमचा विनाअट पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. या बैठकीत पाच हजार पदाधिकाऱ्यांची ऑफिटेव्हिट घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. अजून प्रतिज्ञापत्र भरून आमच्याकडे येणार आहेत. ही सर्व प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अपेक्षित आमदार न आल्याने अजितदादा अस्वस्थ

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात होता. मात्र प्रत्यक्षात बैठकीला त्यापेक्षा कमी आमदार आल्यामुळे अजितदादा बैठकीत कमालीचे अस्वस्थ होते. आमदारांना फोन करून बैठकीस का आला नाहीत अशी विचारणा ते सतत करत होते.

अजित पवारांच्या वांद्रे येथील बैठकीला उपस्थित आमदार

विधानसभा – छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, संजय बनसोडे, अनिल पाटील, बाळासाहेब आजबे, राजू कारेमोरे, आशुतोष काळे, माणिकराव कोकाटे, मनोहर चंद्रिकापुरे, दीपक चव्हाण, संग्राम जगताप, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, इंद्रनील नाईक,  शेखर निकम, नितीन पवार, बाळासाहेब पाटील, राजेश पाटील,  दिलीप बनकर, अण्णा  बनसोडे, अतुल बेनके, दत्तात्रय भरणे, यशवंत माने, दिलीप मोहिते, नीलेश लंके, बबनराव शिंदे, सुनील शेळके, प्रकाश सोळंके.

विधानपरिषद – रामराजे नाईक निंबाळकर, अमोल मिटकरी.

खासदार – प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे.