
सामना ऑनलाईन । मुंबई
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळमधून भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक भोपाळमध्ये सभा घेणार आहेत. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुकुल वासनिक आणि माजी मंत्री नसीम खान यांच्याही भोपाळमध्ये सभा होणार आहेत. भुजबळ यांच्या भोपाळमध्ये तीन सभा होणार आहेत. तर आव्हाड आणि मलीक प्रचार संपेपर्यत म्हणजे 10 मे पर्यंत भोपाळमध्ये तळ ठोकणार आहेत. साध्वींविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठे नेत दिग्विजय सिंग रिंगणात आहेत.
भोपाळ हा भाजपचा बोलकिल्ला आहे. 1984 नंतर भाजपचा या जागेवर पराभव झालेला नाही. त्यामुळे ही जागा प्रतिष्ठेची करत काँग्रेस-राष्ट्रवादीने साध्वींना पराभूत करण्यासाठी चंग बांधला आहे. भाजपने साध्वींना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आपल्या शापामुळेच त्यांचा मृत्यू झाला असे त्या म्हणाल्या होत्या. त्या विधानावरून विरोधकांनी साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती. काँग्रेस राष्ट्रवादीही प्रचरासाठी याचा वापर करत आहे. साध्वींच्या या विधानामुळे भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे भुजबळ म्हणाले. प्रामाणीक आणि सच्च्या अधिकाऱ्याबाबत असे विधान करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रज्ञा यांचे वक्तव्य अयोग्य असल्याचे म्हटले होते. फडणवीस मध्य प्रदेशात भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. मात्र,साध्वी यांच्या प्रचारासाठी ते भोपाळमध्ये जाणार आहेत का याबाबतची माहिती मिळालेली नाही. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
























































