
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या यूपीच्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेस 5 ऑक्टोबरला देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. दलित युवतीवर निर्घृण अत्याचार करीत तिला जीवघेणी मारहाण करणारे आरोपी आणि पीडित कुटुंबाचा छळ करणाऱ्या यूपी पोलिसांविरोधात देशभरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. देशाच्या निष्पाप आणि अबला बेटीला संरक्षण देण्यात अपयशी ठरणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस करत आहे.
हाथरसच्या 19 वर्षीय निर्भयावर निर्दयी युवकांनी जेथे सामूहिक बलात्कार केला आणि तिला मारहाण केली त्या बल गार्गी गावाला काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह अन्य काँग्रेस नेते भेट देणार आहेत.
पोलिसांच्या दडपशाहीविरोधात प्रचंड संताप
14 सप्टेंबरला 19 वर्षीय निर्भयावर बलात्कार आणि त्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर पीडितेच्या कुटुंबावर हाथरस पोलिसांनी केलेल्या दडपशाहीने यूपीसह देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित कुटुंबाला मदत न करता बलात्कारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हाथरस पोलीस व जिल्हा महानगर दंडाधिकाऱ्यांवर होत आहे. अत्याचारी पोलीस आणि हुकूमशाही वृत्तीने वागणारे जिल्हा महानगर दंडाधिकारी यांना आवरू न शकणारे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करीत आहेत.

























































