
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर आज वंचित बहुजन आघाडीसोबत युती करीत असल्याची घोषणा केली. मुंबईत वंचितला 62 जागा देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मुंबईत झालेल्या काँग्रेस आणि वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांनी याबाबत माहिती दिली. आघाडीची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडी मुंबईतील कोणत्या 62 जागा लढणार याची यादी जाहीर करण्यात आली. या यादीवर काँग्रेसच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत तर वंचितकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या सह्या आहेत. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘भारिप’सोबत आमची युती होती. मात्र 1999 नंतर राजकीयदृष्टय़ा आम्ही एकत्र नव्हतो, मात्र आता 25 वर्षांनंतर ‘वंचित’सोबत युती करताना आम्हाला आनंद होत आहे. सत्तेसाठी आमची युती झालेली नसून आमची आघाडी विचारांची आहे. हा संख्येचा खेळ नाही तर विचारांचा मेळ आहे, असे ते म्हणाले.
भाजपला रोखण्यासाठी निर्णय
भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वंचितचे नेते धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले. ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाईन झालेल्या बैठकीत काँग्रेससोबतच्या युतीला मान्यता दिल्याचे ते म्हणाले. आम्ही 62 जागांवर लढणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसने ‘वंचित’ला 62 जागा दिल्या असल्या तरी स्वतः किती जागा लढणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.
मुंबई काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती
काँग्रेस आणि ‘वंचित’ आघाडीची घोषणा होत असताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.



























































