आयुष मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे भाजपचा खोटारडेपणा, काँग्रेसची टीका

1174

ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना झालेला कोरोनाचा संसर्ग आयुर्वेदीक उपचार केल्याने बरा झाल्याचे धादांत खोटे व दिशाभूल करणारे विधान भाजपच्या मोदी सरकारचे आयुष मंत्री व गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी करुन भाजपच्या खोटारडेपणाचे व जुमला संस्कृतीचे विदारक सत्य लोकांसमोर पुन्हा एकदा आणले आहे,अशी टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

ब्रिटनच्या राजघराण्याच्या अधिकृत प्रवक्त्याने हिंदुस्थानच्या आयुष मंत्र्यांचे विधान खोटे असल्याचे सांगितल्याने, कोणताही वैज्ञानिक आधार नसताना केवळ सवंग प्रसिद्धी मिळवीण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या पुढे करुन लोकांना मुर्ख बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अजेंडा पुढे नेण्याचा श्रीपाद नाईकांचा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आहे, असे सांगून चोडणकर म्हणाले, गोव्याचे प्रतिनीधित्व करणाऱ्या श्रीपाद नाईकांच्या या वक्तव्याने गोवेकरांना लाजेने मान खाली घालावी लागली आहे.

टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, आपणच अंधकार करुन आपणच दिवे लावा असे भन्नाट सल्ले लोकांना देऊन नरेंद्र मोदी सरकार देशभक्तीच्या नावाने लोकांना मुर्ख बनवित आहेत. असा आरोप करुन चोडणकर म्हणाले, भाजपची ही जुमला संस्कृती देशाच्या भवितव्याशी खेळ करणारी आहे. आज मोदींच्या नाटकबाजीने देशाला आर्थिक संकटाच्या खाईत लोटले आहे. परंतु भाजपला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. केवळ अंधभक्तीने या सरकारचा कारभार चालला आहे. असेही चोडणकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या