
सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसवर संभाजीनगरातून हद्दपार होण्याची नामुष्की ओढवली आहे. पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज बाद झाला. तर पूर्व मतदारसंघ काँग्रेसने समाजवादी पक्षाला दिला आहे. मध्य मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला गेल्यामुळे शहरात काँग्रेसला मतदारसंघच उरला नाही.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरसह मराठवाडय़ात काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेडातून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पराभूत झाले, तर संभाजीनगरातून काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांची अनामत जप्त झाली. विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज तांत्रिक कारणावरून बाद झाला. काँग्रेसने आघाडीत पूर्व मतदारसंघ सपाला दिला आहे. मध्य मतदारसंघात राष्ट्रवादी लढत आहे. त्यामुळे शहरातून हद्दपार होण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे.
दुसरीकडे पैठण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे यांना पक्षाने दिलेला एबी फॉर्म अवैध ठरला. येथे पक्षाने दोघांना एबी फॉर्म दिला होता. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक अधिकार्यांनी पहिल्या अर्जासोबत आलेला एबीफॉर्म वैध ठरवला.
राष्ट्रवादीच्या यादीत 40 स्टार प्रचारक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे स्टार प्रचारक असून त्याचबरोबर जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचाही या यादीत समावेश आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, सचिव जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवक राष्ट्रवादीचे मेहबूब शेख तसेच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर यांच्यावरही स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.



























































