एलआयसी गुंतवणूक घोटाळा, काँग्रेसची जेपीसी चौकशीची मागणी

अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एलआयसीवर दबाव आणल्याच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हा महाघोटाळा असून याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर हल्ला चढवला. ‘एलआयसीमध्ये सर्वसामान्य जनतेचे पैसे आहेत. लोकांच्या घामाचा हा पैसा आहे. हा पैसा मोदी आपल्या मित्रावर उधळत आहेत. मोदी हे आपल्या परममित्रासाठी काहीही करू शकतात. त्यांना जनतेची कसलीही पर्वा नाही. या बातम्या मीडिया का दाखवत नाही. असा सवाल काँग्रेसने केला आहे.

काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देऊन या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. ‘हा 30 कोटी विमाधारकांच्या पैशांचा दुरुपयोग आहे. केवळ संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातूनच याची चौकशी केली जाऊ शकते. मात्र त्याआधी संसदेच्या लोकलेखा समितीने प्राथमिक चौकशी केली पाहिजे. एलआयसीला अदानी समूहात गुंतवणूक करण्यास कोणी भाग पाडले याचा शोध लोकलेखा समितीने घ्यावा, अशी मागणी रमेश यांनी केली आहे.