प्रार्थनास्थळे खुली करा, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

975

कोरोनामुळे लोक चिंतेत आहेत. त्यांना मानसिक शांतीची आवश्यकता आहे. म्हणून प्रार्थनास्थळे खुली करा अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अमरजीतसिंग मनहास यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. कोरोनामुळे शेकडो रुग्ण दगावत आहेत. रोज हजारो नागरिक पॉझिटिव्ह आढळत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंता व घबराट निर्माण झाली आहे. आपल्या वेदना देवासमोर व्यक्त करण्यासाठी ते उत्सुक आहेत. परंतु प्रार्थनास्थळे बंद असल्याने त्यांना तिथे जाता येत नाही, असे मनहास यांनी या पत्रात म्हटले आहे.

पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक या राज्यांनी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत प्रार्थनास्थळे खुली केली आहेत असे उदाहरणही या पत्रात देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रार्थनास्थळे बंद असल्याने तिथे काम करणाऱया कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या