
शहरातील नगर परिषदेच्या हद्दीतील मालमत्तेची बोगस नोंदणी करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत त्या नोंदी रद्द करून संबंधीत प्रकरणात दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नगर पालिकेच्या समोर मंगळवारपासून काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास महाजन व प्रकाश ससाणे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
शहराच्या हद्दीतील सर्वे नंबर 126/1/3/3 मधील प्लॉट ज्याची मालमत्ता क्रमांक ई.980 ते 1053 व सर्वे नंबर 148/4/1 मधील प्लॉट ज्याची मालमत्ता क्रमांक ई. 1054 ते ई.1139 पर्यंत सर्व प्लॉट अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांच्या संगनमताने आर्थिक देवाण घेवाण करून या मालमत्तेची बोगस नोंद केली आहे. या सर्व प्लॉटचे एन.ए. ले आऊट मंजूर नसताना व कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता नगरपालीकेच्या मालमत्ता नोंद रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली आहे. अशा या भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी तसेच पदाचा दुरुपयोग करून बोगस नोंद करून देण्यास सहकार्य करणाऱ्या दोषी नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करून खोट्या नोंदी केल्याबद्दल फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी नगर परिषदेच्या समोर मंगळवारपासून काँग्रेसचे विकास महाजन व प्रकाश ससाने बेमुदत उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत मद्दे, शिवकुमार उटगे, मुज्जमिल सय्यद, प्रफुल्ल ढवळे, रेणुकादास पांचाळ, बंडू येरमे, शिवाजी जंगापल्ले, गिरीष काडवादे, माधव पाटील उपस्थित होते.
अहमदपूर नगरपालीका अनेक विषयामुळे सतत चर्चेत रहात असते. शहरामध्ये नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यापेक्षा कोणत्या पध्दतीने आपले उखळ पांढरे होते, यासाठी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक प्रयत्न करतात. शहरामध्ये स्वच्छता, पाणी, वीज तसेच जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यापेक्षा गैरमार्गाचा वापर करून जनतेची दिशाभूल करून काम करण्यामध्ये अहमदपूर नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कोंडी होत आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.


























































